राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या मशिदींवरील भोंग्याविरुद्ध हनुमान चालिसा लावण्याच्या घोषणेवर सडकून टीका केली. “हनुमान चालिसा हनुमान चालिसा काय लावलं आहे. तुमच्या एकाही पदाधिकाऱ्याला हनुमान चालिसा मुखोद्गत (पाठ) नाही. तुम्हालाही दोन ओळी म्हणता आल्या नाहीत,” असं म्हणत अमोल मिटकरी यांनी थेट राज ठाकरेंवर हल्ला चढवला. मिटकरी यांनी व्हिडीओद्वारे आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अमोल मिटकरी म्हणाले, “हनुमान चालिसा हनुमान चालिसा काय लावलं आहे. तुमच्या एकाही पदाधिकाऱ्याला हनुमान चालिसा मुखोद्गत (पाठ) नाही. तुम्हालाही दोन ओळी म्हणता आल्या नाहीत. आम्ही हनुमान चालिसा लहानपणापासून पाळण्यात शिकलेली हिंदू माणसं आहोत. तुलसीदासांनी इतकं सुंदर हनुमान चालिसा लिहिलं आहे. रामचरितमानसवर उर्दु शब्दांचाही प्रभाव आहे. हे तुम्ही कबुल करा. मुस्लिमांचा विरोध करू नका.”

“तुम्ही महाराष्ट्रात किती मुस्लीम द्वेष पेरणार आहात?”

“मुस्लिमांनी रामावर सर्वात सुंदर भजन म्हटलं आहे. त्यांचं नाव आहे मोहम्मद रफी, चित्रपट गोपी, भजन आहे ‘सुख के सब साथी, दुःख में न कोई, मेरे राम, तेरो नाम एक साचा दुजा न होए’. दिलीप कुमार बाळासाहेब ठाकरे यांचे जीवश्य मित्र होते. ते जातीने मुस्लीम होते, त्यांनी गोपीची भूमिका केली. डॉ. जलील परकार हेही बाळासाहेबांचे निकटवर्तीय होते. तुम्ही महाराष्ट्रात किती मुस्लीम द्वेष पेरणार आहात. महाराष्ट्रात जातीय दंगे भडकणार नाहीत. महाराष्ट्रात कायदा आणि सुव्यवस्थेचं राज्य आहे,” असं अमोल मिटकरी यांनी सांगितलं.

“तुम्हाला हनुमान चालीसाच्या दोन ओळी म्हणता येत नाही”

“राज ठाकरे हे दंगली भडविण्याचे काम करीत आहेत. समान नागरिक कायदा अपेक्षित होता. हा कायदा नेमका कशासाठी खातात, हे तरी त्यांनी वाचून घ्यावे. प्रसिद्धीसाठी पोकळ घोषणा करता. यातून हाती काहीच लागणार नाही. तुम्ही संभाजीनगरला जा, अयोध्येला जा, श्रीरामाचे दर्शन घेताना आत्मीयेतेने दर्शन घ्या. चेहऱ्यावर सात्विक भाव येऊ द्या. हनुमान चालीसाच्या दोन ओळी तुम्हाला म्हणता येत नाही,” असा खोचक टोला आमदार अमोल मिटकरी यांनी राज ठाकरे यांना मारला.

“भोंगे वाटणे, हातात तलवारी घेणे, तलवारी वाटणे हे आमचे प्रश्न नाहीत”

राज ठाकरे यांनी केलेल्या व्यक्तव्याचा अमोल मिटकरी यांनी जोरदार समाचार घेतला. ते म्हणाले, “दोन वर्षांपासून राज्यावर आर्थिक संकट आहे. आता कुठे राज्य आर्थिक संकटातून बाहेर पडत आहे. सर्वसामान्य हिंदू असेल, सर्वसामान्य मुस्लीम असले त्यांचे रोजंदारीचे उदरनिर्वाहाचे प्रश्न आहेत. भोंगे वाटणे, हातात तलवारी घेणे, तलवारी वाटणे हे आमचे प्रश्न नाहीत.”

“सर्वोच्च न्यायालयाचा निकाल परत एकदा वाचावा, त्यात…”

“राज्याला फुले, शाहू आंबेडकर यांची परंपरा आहे. देशाला बाबासाहेब यांनी संविधान दिले आहे. सर्वोच्च न्यायालयाचा निकाल वाचून जर काही लोकांना वाटत असेल तर काही लोकांना वाटत असेल तर मशिदीवरील भोंगे उतरवा, तर सर्वोच्च न्यायालयाचा निकाल परत एकदा वाचावा. त्यात रात्री १० ते सकाळी ६ वाजेपर्यंत कोणत्याही धार्मिक स्थळावर भोंगे वाजता कामा नाही, असा निकाल आहे,” असं अमोल मिटकरी यांनी सांगितलं.

हेही वाचा : “देशभरातील सर्व देशभक्त हिंदू बांधवांनी तयारीत राहा, आत्ता…”, राज ठाकरेंचं पुण्यातून आवाहन

“…तर गृह विभागाने चिथावणीखोर वक्तव्य करणाऱ्यांवर कारवाई केली पाहिजे”

“त्यांनी तलवारी काढल्या तर आम्ही तलवारी काढू अशा प्रकारच्या वलग्ना करायच्या. काल महाराष्ट्राने तुमचे मनसुबे उधळले आहे. अनेक ठिकाणी मुस्लिमांनी हनुमान चालिसा वाचली. कायद्याचे राज्य आहे. कायद्याने राज्य चालते. हिंदू, मुस्लीम यांना शिक्षणाचे, बेरोजगारीचे दरवाढीचा प्रश्न महत्वाचे आहे. दंगली भडकल्या, तर गृह विभागाने लक्ष दिले पाहिजे की चिथावणीखोर वक्तव्य करणाऱ्यांवर कारवाई केली पाहिजे,” अशी मागणीही आमदार अमोल मिटकरी यांनी केली.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ncp mla amol mitkari criticize mns chief raj thackeray over masjid loud speaker and hanuman chalisa pbs
First published on: 17-04-2022 at 14:34 IST