पुण्याच्या मावळमध्ये राष्ट्रवादीच्या विद्यमान सरपंचाची कोयत्याने वार करून निर्घृण हत्या करण्यात आली आहे. तालुक्यातील प्रतिशिर्डी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शिरगाव येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या सरपंचावर अज्ञात आरोपींनी कोयत्याने सपासप वार करत जीवघेणा हल्ला केला. या हल्ल्यात सरपंचाचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. या गंभीर घटनेमुळे मावळ परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
हेही वाचा >>> लोणावळा: सिमेंट रस्ता खोदाईचा जाब विचारणाऱ्या ग्रामपंचायत सदस्याला मारहाण
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिरगाव च्या प्रतिशिर्डी साईबाबांच्या मंदिरासमोर शनिवारी रात्री अज्ञात व्यक्तींनी प्रवीण गोपाळे (वय ४७) यांच्यावर प्राणघातक हल्ला करून त्यांची हत्या करण्यात आली आहे. शनिवारी रात्री प्रवीण हे साई बाबांच्या मंदिरासमोर आले तेव्हा त्यांच्यावर दुचाकीवरून आलेल्या अज्ञात व्यक्तींनी धारदार कोयत्याने हल्ला केला. जीव वाचवण्यासाठी प्रवीण सैरावैरा धावत होते. अखेर त्यांना गाठून त्यांच्या चेहऱ्यावर सपासप वार करण्यात आले करून निर्घृण हत्या करण्यात आली. या घटनेमुळे मंदिर परिसरात एकच गोंधळ उडाला होता. स्थानिक नागरिकांमध्ये सध्या भीतीचे वातावरण पसरले आहे. घटनेच्या काही मिनिटांनी पिंपरी- चिंचवड पोलिसांचा मोठा फौज फाटा दाखल झाला आहे. अज्ञात आरोपींचा शोध सीसीटीव्हीद्वारे पोलिस घेत आहेत. काही महिन्यांपूर्वी शिरगाव ग्रामपंचायत ची निवडणूक पार पडली. राष्ट्रवादी गटाचे प्रवीण गोपाळे हे सरपंच पदी विराजमान झाले होते. जमिनीच्या वादातून ही हत्या झाल्याचं पोलिस सूत्रांकडून सांगण्यात येत आहे.