लोकसत्ता प्रतिनिधी

पुणे: कुष्ठरोगी, अंध, अपंग अशा समाजाने नाकारलेल्या लोकांमधील कलाकौशल्य ओळखून त्यांच्या हातांना डॉ. बाबा आमटे यांनी काम दिले. या गोष्टीवरून त्यांच्यावर टीकाही झाली होती. मात्र याच कुष्ठरुग्ण अभियंत्यांनी त्यांच्यातील अंगभूत कौशल्य आणि तंत्रज्ञानाचा वापर करून आनंदवन, हेमलकसा आणि किल्लारी (जि. लातूर) येथे पर्यावरणपूरक घरेच नाही तर गावे उभारली. अशा समाजाने नाकारलेल्यांचे कलाकौशल्य जगासमोर नेण्यासाठी सर्वांनी सहकार्य करण्याची गरज आहे, असे आवाहन आनंदवन संस्थेचे संचालक डॉ. विकास आमटे यांनी रविवारी केले.

उर्वी संस्थेच्या वतीने बालगंधर्व कलादालन येथे भरविण्यात आलेल्या ‘गाव भ्रमण’ या प्रदर्शनाचे उद्घाटन डॉ. विकास आमटे यांच्या हस्ते करण्यात आले. त्याप्रसंगी ते बोलत होते. संस्थेच्या संस्थापक-संचालक अमृता नायडू, प्रसाद थेटे आणि नरेंद्र नायडू या वेळी उपस्थित होते. सोमवारी (२७ मार्च) सकाळी दहा ते रात्री आठ या वेळात हे प्रदर्शन खुले राहणार आहे.

डॉ. आमटे म्हणाले, आपली जंगले आणि तेथे वास्तव्य करणाऱ्या आदिवासींचे जगणे आजही समृद्ध आहे. त्यांच्या गरजा मर्यादित आहेत. दंडकारण्यात मी काम सुरू केले होते तेव्हा तेथे एकही भिकारी दिसला नाही. बाबा आमटे यांनी तेथील कुष्ठरुगण, अंध, अपंग अशा समाजाने नाकारलेल्यांच्या हातांना कामे दिली. माझ्या आईने त्यांच्या लग्नाची कल्पना सत्यामध्ये साकारली. मात्र, त्यांना सुयोग्य घरे असावीत या संकल्पनेतून त्यांच्याच कलाकौशल्य आणि कष्टांतून लाकूड, लोखंड यांचा कमीत कमी वापर करून पर्यावरणपूरक घरे उभारली गेली. किल्लारी येथे उभारण्यात आलेल्या घरांची दखल घेत तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार यांनी घेत कुष्ठरुग्ण, अंध, अपंगाना प्रशिक्षण देण्याचे नियोजन केले. ‘एकलव्य विद्यापीठ’ अशा समर्पक शब्दांत पु. ल. देशपांडे यांनी आनंदवनचा गौरव केला आहे. कुष्ठरुग्णांमधील हेच कौशल्य व तंत्रज्ञान आता जगासमोर येण्याची गरज आहे.

डॉ. विकास आमटे यांच्या कार्यापासून प्रेरणा घेत उर्वी संस्थेचा जन्म झाला असून आनंदवनातील घर उभारणीमध्ये खारीचा वाटा उचलता आला याचे समाधान असल्याची भावना वास्तुविशारद अमृता नायडू यांनी व्यक्त केली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

शब्द एकच असला तरी इंग्रजी स्पेलिंग वेगळे असल्याने त्याचे अर्थ वेगवेगळे आहेत. ‘पेन’ म्हटल्यावर लेखणी आठवते आणि लेखणीशी मैत्री (पेन फ्रेंडशिप) करावीशी वाटते. पण, पेन या शब्दाचा दुखणी हादेखील एक अर्थ आहे. त्यामुळे लेखणीशी मैत्री करताना ‘दुखण्याशीही मैत्री करा’ -डॉ. विकास आमटे, संचालक, आनंदवन