लोकसत्ता प्रतिनिधी

पिंपरी: मोशी- बोऱ्हाडेवाडी येथील पिंपरी-चिंचवड न्यायालयाच्या इमारतीच्या उभारणीला आता गती मिळाली आहे. त्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने ८६ कोटी २४ लाख ५१ हजार १६६ रुपयांची निविदा प्रसिद्ध केली आहे.

मोरवाडी येथील न्यायालयाच्या इमारतीमध्ये फौजदारी आणि दिवाणी न्यायालयाचे कामकाज चालत होते, मात्र, वाढत्या खटल्यांची संख्या आणि वकील, अशिलांच्या सुविधांसाठी न्यायालयाच्या इमारतीचा विस्तार करण्याचा प्रस्ताव होता. त्यासाठी मोशी- बोऱ्हाडेवाडी येथील प्राधिकरणाच्या पेठ क्रमांक १४ मध्ये १६ एकर जागा २०११ मध्ये देण्यात आली. इमारतीचे काम सुरू होत नव्हते. त्यामुळे काही कालावधीकरिता मोरवाडी येथील दिवाणी व फौजदारी न्यायालयाचे महापालिकेच्या नेहरूनगर येथील अण्णासाहेब मगर स्टेडियम समोरील नव्या इमारतीत स्थलांतरण करण्यात आले आहे.

हेही वाचा… गणेशोत्सवात तीन दिवस मद्यविक्री बंद

आता मोशीतील पिंपरी-चिंचवड न्याय संकुल उभारण्याच्या कामाला गती येताना दिसत आहे. न्याय संकुलासाठी राज्य शासनाने ८६ कोटी २४ लाख ५१ हजार १६६ रुपयांच्या खर्चाला मान्यता दिली आहे. त्यानुसार सार्वजनिक बांधकाम विभागाने ऑनलाइन निविदा प्रणालीद्वारे पात्र, सक्षम कंत्राटदार, संस्था, कंपनीकडून निविदा मागविल्या आहेत. ई-निविदा उपलब्ध कालावधी ११ सप्टेंबर ते ३ ऑक्टोबर २०२३ असा आहे. इच्छुक कंत्राटदारांची निविदापूर्व चर्चा बेठक २० सप्टेंबर रोजी सार्वजनिक बांधकाम विभाग पुणे येथे होणार आहे. तसेच, निविदा उघडण्याची तारीख ५ ऑक्टोबर २०२३ अशी निश्चित करण्यात आली आहे. सर्व निविदा http://www.mahapwd.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करुन देण्यात आली आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

महायुती सरकारच्या काळात निविदा प्रक्रिया करुन इमारतीच्या प्रत्यक्ष कामाला सुरूवात होणार आहे. मोशीत चार मजली प्रशस्त इमारतीचे बांधकाम होणार आहे. अद्ययावत न्यायालय पिंपरी-चिंचवडकरांसाठी आगामी दोन वर्षांत उपलब्ध होईल. सार्वजनिक बांधकाम विभागाने निविदा प्रक्रियेचे कामकाज निर्धारित वेळेत पूर्ण करून इमारतीच्या कामाला सुरूवात करावी. नोव्हेंबर २०२३ मध्ये इमारतीच्या कामाचे भूमिपूजन मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्या उपस्थित करण्याचे नियोजन आहे. – महेश लांडगे, आमदार, भोसरी