पुणे : पुणे, पिंपरी-चिंचवडसह नगर रस्त्यावरील वाहतुकीची कोंडी फोडण्यासाठी उपयुक्त ठरणाऱ्या शिरूर-चाकण-तळेगाव-कर्जत-उरण या कागदावरील नव्या मार्गाला गती मिळण्याची शक्यता आहे. या मार्गासाठी शासन स्तरावर हालचाली सुरू झाल्या असून, या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचा प्रस्ताव मंत्रिमंडळाच्या बैठकीत सादर करण्याची सूचना पालकमंत्री अजित पवार यांनी केली आहे.

शिक्रापूर-चाकण-तळेगाव-लोणावळा मार्गावरील मोठ्या प्रमाणावरच्या औद्योगिक क्षेत्रामुळे या मार्गावर सातत्याने वाहतुकीचा ताण असतो. त्यामुळे हा नवा मार्ग प्रस्तावित करण्यात आला आहे. या प्रस्तावित मार्गामुळे मराठवाड्यातून मुंबईकडे जाणारी वाहतूक शिरूर-खेड मार्गे थेट कर्जतला जाणार आहे. त्यामुळे मुंबईकडे जाण्यासाठीही पर्यायी मार्ग उपलब्ध होणार आहे. गेल्या काही महिन्यांपासून हा मार्ग कागदावरच राहिला होता.
या मार्गासंदर्भात उपमुख्यमंत्री, पालकमंत्री अजित पवार यांनी गेल्या आठवड्यात बैठक घेतली. त्यामध्ये त्यांनी यासंदर्भात प्रस्ताव मंत्रिमंडळाच्या बैठकीत सादर करण्याची सूचना सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना केली.

सध्या मराठवाड्यातून येणाऱ्या वाहनांना मुंबईला जाण्यासाठी चाकण-शिक्रापूर-तळेगाव या मार्गे मुंबईला जावे लागते. चाकण आणि शिरूर येथील ‘एमआयडीसी’मुळे नगर रस्त्यावर मोठी गर्दी असते. मालवाहतूक करणाऱ्या वाहनांसाठीही हाच एकमेव रस्ता आहे. त्यामुळे हा मार्ग प्रस्तावित करण्यात आला आहे.

‘मल्टिनोडल काॅरिडाॅर’ म्हणून हा मार्ग ओळखला जाणार असून, तो चार पदरी असणार आहे. त्याची एकूण लांबी १३५ किलोमीटर एवढी असून, त्यासाठी बारा हजार ५०० कोटींचा खर्च अपेक्षित आहे. या मार्गामुळे प्रवासाचा कालावधी आणि वाहतूक खर्चही कमी होणार आहे. या महामार्गाचे काम बांधा-वापरा-हस्तांतरित करा (बीओटी) तत्त्वावर होणार असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम विभागातील अधिकाऱ्यांनी दिली. हा महामार्ग पूर्ण झाल्यानंतर पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील वाहतुकीची कोंडी ८० टक्क्यांनी कमी होईल, असा दावाही करण्यात येत आहे.

या प्रकल्पाचे काम दोन टप्प्यांत होणार असून, पहिल्या टप्प्यात ६० किलोमीटर लांबीचा आणि दुसऱ्या टप्प्यात उर्वरित ७५ किलोमटीर लांबीचा रस्ता पूर्ण केला जाणार आहे. शिरूर, तळेगाव आणि कर्जमधील औद्योगिक आणि कृषी व्यापाराला या मार्गामुळे चालना मिळण्याची शक्यता आहे. राज्य शासनाची या प्रकल्पाला मंजुरी मिळाल्यानंतर एका वर्षात भूसंपादन करून त्यापुढे दोन ते तीन वर्षांत महामार्गाचे बांधकाम पूर्ण करण्याचे नियोजन आहे.

दृष्टिक्षेपात रस्ता

  • शिरूर-पाबळ-राजगुरूनगर-शिरवली मार्गे पाईट-वांद्रे-कर्जत असा सुमारे १३५ किलोमीटरचा मार्ग
  • कर्जत मार्ग पुढे पनवेल-उरणला जोडला जाणार
  • या नवीन मार्गामुळे मुंबईला जाण्यासाठी आणखी एक मार्ग उपलब्ध
  • औद्योगिक आणि कृषी क्षेत्राला चालना
  • भूसंपादन तसेच रस्ते बांधण्यासाठी सुमारे १२ हजार ५०० कोटींचा खर्च
  • प्रकल्पासाठी ६७० हेक्टर जागेचे संपादन
  • बीओटी तत्त्वावर प्रकल्पाची उभारणी
  • मार्गावर पाच बोगदे, सहा मोठे पूल, ४८ लहान पूल