scorecardresearch

“त्या कुटुंबाबर ओरखडे ओढण्यापेक्षा बिनविरोध निवडणूक व्हायला पाहिजे”; नवनिर्वाचित आमदार अश्विनी लक्ष्मण जगताप यांचे विधान

अश्विनी जगताप म्हणाल्या, कुणाच्या ही घरात अस झालं तर तिथं निवडणूक ही बिनविरोध व्हावी

Reaction of MLA Ashwini Laxman Jagtap on unopposed by-election
बिनविरोध पोटनिवडणुकीवर नवनिर्वाचित आमदार अश्विनी लक्ष्मण जगताप यांची प्रतिक्रिया

चिंचवड विधानसभेच्या नवनिर्वाचित महिला आमदार अश्विनी लक्ष्मण जगताप यांनी बिनविरोध निवडणुकीवर परखड मत व्यक्त केले आहे. विद्यमान आमदाराचे निधन झाल्यास तिथं निवडणूक न लढवीता ती जागा बिनविरोध द्यायला हवी. उगाच निवडणूक लढवून त्या कुटुंबावर ओरखडे ओढणे चुकीचे असल्याचे त्यांनी म्हटलं आहे. अश्विनी लक्ष्मण जगताप यांचा आज आमदारकीचा पहिला दिवस होता. त्यांनी मतदार संघातील पिंपळे गुरव येथे असलेल्या कार्यालयात येऊन कामकाज पाहण्यास सुरुवात केली. यावेळी त्यांनी हे मत व्यक्त केले आहे.

हेही वाचा- कसब्याची पुनरावृत्ती कोथरूडमध्ये?

चिंचवड विधानसभा पोटनिवडणूकीत विजयी झालेल्या आमदार अश्विनी लक्ष्मण जगताप यांनी पहिल्याच दिवशी कामकाज करण्यास प्राधान्य दिले. ३६ हजारापेक्षा अधिक मताधिक्याने विजयी झाल्यानंतर त्यांनी आज पहिल्याच दिवशी मतदारसंघातील प्रश्न समजून घेण्याचा प्रयत्न केला. यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हणाल्या की, आमदार म्हणून साहेबांनी (दिवंगत लक्ष्मण जगताप) जशी सुरुवात करायचे तशीच सुरुवात आज माझी झाली आहे. ते लवकर उठून कार्यालयात यायचे. इथं आलेले नागरिक पाहून मला आनंद होतो आहे. साहेबांच्या खुर्चीवर बसले आहे. त्यामुळं अधिक जबाबदारी वाढली आहे. मताच्या रूपाने मला मतदारांनी मोठा पाठिंबा दिला आहे. शास्तीकर आणि अनधिकृत बांधकाम हा प्रश्न मार्गी लावायचा आहे. इथपर्यंत येईल असं मी स्वप्नात ही पाहिलं नव्हतं. साहेबांच्या निधनामुळे आणि नागरिकांच्या आग्रहवास्तव मी निवडणूक लढवण्याच ठरवलं असं अश्विनी जगताप म्हणाल्या.

हेही वाचा- “जनतेच्या मनातील आमदार मीच” म्हणणाऱ्या बंडखोर राहुल कलाटेंचे डिपॉझिट जप्त!

बिनविरोध पोटनिवडणूक व्हायला हवी का? या प्रश्नावर त्यांनी उत्तर दिले. त्या म्हणाल्या की, अशा घटना घडल्यास तिथं बिनविरोध निवडणूक व्हायला हवी. त्या कुटुंबावर, कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांवर दुःखाचा डोंगर असतो. निवडणूक लढवून ओरखडा ओढणे फार चुकीचे आहे. कुणाच्या ही घरात अस झालं तर तिथं निवडणूक ही बिनविरोध व्हावी, असे स्पष्ट मत त्यांनी व्यक्त केले आहे.

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 03-03-2023 at 19:37 IST