संजय जाधव
पुणे : मध्य रेल्वेच्या पुणे आणि सोलापूर विभागातील कामांचा नऊ खासदारांनी आढावा घेतला. या बैठकीत खासदारांनी रेल्वेच्या कामाची झाडाझडती घेतली. अमृत भारत स्थानक योजनेअंतर्गत रेल्वे स्थानकांची सुरू असलेली कामे, प्रवासी सुविधांशी संबंधित विकासकामे आणि रेल्वेशी संबंधित समस्या यावर चर्चाही करण्यात आली. पुण्यातील विभागीय रेल्वे व्यवस्थापक कार्यालयात झालेल्या या बैठकीला खासदार श्रीनिवास पाटील, वंदना चव्हाण, सदाशिव लोखंडे, श्रीरंग बारणे, डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामी, डॉ. सुधाकर श्रंगारे, रणजितसिंह नाईक निंबाळकर, धैर्यशील माने, ओमराजे निंबाळकर आदी उपस्थित होते. मध्य रेल्वेचे सरव्यवस्थापक नरेश लालवाणी आणि विविध विभागांच्या प्रमुखांसह पुणे आणि सोलापूर विभागाचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक बैठकीला हजर होते.
बैठकीत खासदारांनी सरव्यवस्थापक आणि इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चालू असलेल्या आणि पूर्ण झालेल्या विविध रेल्वे प्रकल्पांवर सविस्तर चर्चा केली. बैठकीत श्रीरंग बारणे यांची पुणे रेल्वे विभागाच्या विभागीय संसदीय समितीच्या अध्यक्षपदी आणि डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामी यांची सोलापूर रेल्वे विभागाच्या विभागीय संसदीय समितीच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली.
आणखी वाचा-नद्यांच्या संवर्धनासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेचा पुढाकार… नदी सुरक्षा दल नेमणार
पुणे विभागाच्या विभागीय रेल्वे व्यवस्थापक इंदू दुबे आणि सोलापूर विभागाचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक नीरजकुमार दोहरे यांनी पूर्ण झालेल्या आणि चालू असलेल्या कामांचे सादरीकरण केले.
प्रवासी गाड्यांना नवीन थांबे, विविध स्थानकांवर पुरविण्यात आलेल्या लिफ्ट आणि एस्केलेटर सुविधा, लेव्हल क्रॉसिंग रेल्वे फाटकाच्या जागी भुयारी मार्ग, उड्डाणपूल, रेल्वे मार्गांचे दुहेरीकरण, रेल्वे थांबे, फलाट विस्तार, नवीन गाड्यांचे विद्युतीकरण, एलईडी दिवे, यूटीएस मोबाइल उपयोजन तिकीट प्रणाली, स्थानकांचे सुशोभीकरण आदी विविध विषयांवर बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आली. या बैठकीत एकूण तीनशेहून अधिक मुद्द्यांवर चर्चा झाली.
आणखी वाचा-पुणे: ससूनचा अजब कारभार!आयुर्वेदिक डॉक्टर बनला ससूनच्या अधिष्ठात्यांचा ‘पीए’
पुणे-लोणावळा तिसरी आणि चौथी मार्गिकेचे काम लवकर सुरू करावे. पुणे-लोणावळा लोकलच्या सेवेत वाढ करावी आणि दौंडपर्यंत या सेवांचा विस्तार करावा. लोणावळा-दौंड विभागात ईएमयू रेक देखभाल डेपो तयार करण्यात यावा. -वंदना चव्हाण, खासदार
अमृत भारत योजनेअंतर्गत स्थानकांची कामे लवकर पूर्ण करावीत. पुणे ते लोणावळा लोकलची सेवा वाढवायला हवी. रेल्वे मार्गांवर अनेक ठिकाणी भुयारी मार्ग आणि उड्डाणपुलांची उभारणी आवश्यक आहे. -श्रीरंग बारणे, खासदार