पुणे : निपुण भारत अभियानाअंतर्गत जिल्हा परिषदेने केलेल्या सर्वेक्षणात जिल्ह्यातील १ हजार ९९८ शाळांमध्ये शून्य टक्के गुणवत्ता वाढ झाल्याचे, २६३ शाळांची गुणवत्ता उणे झाल्याची, तर १६० शाळांनी गुणवत्ता वृद्धी उपक्रम राबवलाच नसल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी शैक्षणिक ग्रामसभेच्या माध्यमातून शाळा आणि विद्यार्थ्यांच्या गुणवत्तावाढीसाठी काम करण्याचे आवाहन सरपंचांना केले आहे.

हेही वाचा >>> शाळांमध्ये किमान एक कला शिकणे अनिवार्य करण्याची गरज; ज्येष्ठ अभिनेते मनोज बाजपेयी यांचे मत

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

जिल्ह्यातील दुसरी ते पाचवीच्या विद्यार्थ्यांसाठी निपुण भारत गुणवत्तावृद्धी कार्यक्रम १९ डिसेंबर ते ११ फेब्रुवारी या कालावधीत राबवण्यात आला. त्यानंतर २२ फेब्रुवारी ते २८ फेब्रुवारी या कालावधीत शाळा स्तरावर विद्यार्थ्यांचे संपादणूक सर्वेक्षण करण्यात आले. त्यात जिल्ह्यातील ७१ शाळांमध्ये ५१ ते १०० टक्के गुणवत्ता वाढ झाली, तर १ हजार ९४१ शाळांमध्ये १ ते ५१ टक्के म्हणजे अल्प गुणवत्ता वाढ झाली. त्यामुळे गुणवत्तावृद्धी कार्यक्रमात गुणवत्ता वाढ न झालेल्या, गुणवत्ता खालावलेल्या, उपक्रम न राबवलेल्या शाळांमध्ये पुन्हा गुणवत्तावाढ कार्यक्रम राबवला जाणार आहे. त्यामुळे सरपंचांनी शाळांच्या गुणवत्तावाढीमध्ये लक्ष घालण्याबाबतचे पत्र सरपंचाना दिले आहे.  तसेच निपुण भारतच्या अंमलबजावणीबाबत गटशिक्षणाधिकारी, केंद्रप्रमुख, मुख्याध्यापक, शिक्षक यांनाही सूचना देण्यात आल्या आहेत. मुख्याध्यापकांच्या मदतीने शैक्षणिक ग्रामसभा आयोजित करून शाळा केंद्रस्थानी ठेवून चर्चा करावी, निपुण भारत अंतर्गत निश्चित केलेले ध्येय, उद्दिष्ट, इयत्तानिहाय अध्ययन निष्पत्ती या संदर्भातील फलक गावाच्या दर्शनी भागात लावावेत, निपुण भारत अभियानाची गावपातळीवर जागृती करावी, गावातील युवक, युवतींचा स्वयंसेवक म्हणून शाळेतील शैक्षणिक प्रक्रियांमध्ये सहभाग वाढवण्यासाठी प्रयत्न करावा, असे पत्रात नमूद करण्यात आले आहे.