बारामती लोकसभा अंतर्गत येणाऱ्या सहा विधानसभा मतदार संघातील बनावट मतदार कमी करा, केंद्राच्या योजना लोकांपर्यंत पोहोचवा, बाहेरून नोकरी व व्यवसायानिमित्त आलेल्या मतदारांना संपर्क करून आपलेसे करा. कार्यकर्त्यांनी आतापासून २०२४ च्या लोकसभा निवडणुकीच्या कामाला लागावे. बारामतीबाबत दिल्लीतून कोणत्याही प्रकारची तडजोड होणार नाही, अशी ग्वाही केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी भाजप कार्यकर्त्यांना दिली. राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या बारामती लोकसभा मतदार संघात विजय मिळविण्यासाठी भारतीय जनता पक्षाने बारामती मोहीम हाती घेतली आहे. त्याअंतर्गत केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन बारामतीच्या दौऱ्यावर आल्या आहेत. 

हेही वाचा- मागील मुख्यमंत्री अडीच वर्षात मंत्रालयात आले नाही, मुख्यमंत्री शिंदे हे कुठे मौजमजा करण्यास फिरत नाहीत – शंभूराज देसाई

तयारीला लागण्याच्या कार्यकर्त्यांना सूचना

बारामती लोकसभा मतदार संघाच्या मंडल अध्यक्ष आणि जिल्हा पदाधिकारी यांच्या संघटनात्मक कार्यक्रमात केंद्रीय अर्थमंत्री सीतारामन बोलत होत्या. सीतारामन यांच्या भाषणाआधी बोलताना दौंडचे आमदार राहुल कुल यांनी आपले केंद्रीय नेते बारामतीमध्ये येऊन कौतुक करतात. त्या ठिकाणी नसलेल्या मॉडेलची वाहवा करतात. त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण होतो. अशाने आपण बारामती कशी जिंकणार?, असा सवाल केला.
हा धागा पकडून पदाधिकाऱ्यांशी बोलताना सीतारामन म्हणाल्या, ‘पक्षाच्या केंद्रीय स्तरावर आणि दिल्लीतून बारामतीबाबत कोणत्याही प्रकारची तडजोड होणार नाही. त्यामुळे पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी संभ्रमात राहू नये. आतापासून २०२४ च्या तयारीला लागा’, अशा सूचनाही त्यांनी कार्यकर्त्यांना दिल्या.

‘मोदी सरकार २०१४ मध्ये सत्तेत आल्यानंतर माझ्याकडे वाणिज्य व व्यापार खाते देखील होते. युरोपीय महासंघाने द्राक्ष उत्पादन घेताना रसायन वापराबाबत काही कठोर निर्णय २०१४ पूर्वीच घेतले होते. त्यामुळे निर्यातीला मर्यादा आल्या होत्या. युरोपीय महासंघाने या निर्णयाची अंमलबजावणी होण्यासाठी वेळ दिला होता. वास्तविक ही समस्या शरद पवार केंद्रीय कृषीमंत्री असताना निर्माण झाली होती. मात्र, त्यावर पवार यांनी काहीच केले नाही. पुणे जिल्ह्यातील शेतकरी घेऊन नितीन गडकरी माझ्याकडे आले होते आणि त्यानंतर मोदी सरकारने यावर तोडगा काढला.’ असेही त्या म्हणाल्या.

बारामतीतील समस्या आक्रमकपणे मांडा

‘बारामती लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेतल्यानंतर माझ्या एक गोष्ट लक्षात आली, की आपला पक्ष बारामतीमध्ये बचावात्मक आहे. राष्ट्रवादीचे नेते भ्रष्टाचार केल्याने तुरुंगात गेले आहेत. बारामतीमधील कित्येक गावात पाण्याची समस्या आहे. हे प्रश्न आक्रमकपणे मांडा. यावर बोला, सोशल मीडियात मांडा, तरच मग लोक पुढे येतील. यासह बारामती जिंकण्यासाठी या लोकसभा मतदारसंघात येणाऱ्या सहाही विधानसभा मतदारसंघातील बोगस मतदार कमी करा, पुणे जिल्ह्यात बाहेरून आलेल्यांना संपर्क करावा, प्रथम मतदारांसह नोकरी, व्यवसाय निमित्ताने या ठिकाणी आलेल्यांना संपर्क करावा. ते येथेच राहणार असल्यास त्यांना येथे मतदार करून घ्या, त्यांच्या समस्या वेगळ्या असतील त्या ओळखा आणि सोडवा. याचा फायदा पक्षाला होईल’ अशा सूचना त्यांनी केल्या.

भाजपा जगातील सर्वात मोठा पक्ष

जगातील सर्वात मोठा पक्ष भाजपा आहे. मात्र, असे सांगण्याची मला आता भीती वाटते. कारण यामुळे काही प्रमाणात कार्यकर्ते निर्धास्त होण्याची भीती आहे. या ठिकाणचे काही बूथ कमजोर आहेत, ते मजबूत करा. बारामतीमधील प्रलंबित विकासकामांसाठी केंद्राकडून नक्की मदत करू, निधी देऊ, अशी ग्वाही सीतारामन यांनी यावेळी दिली.