पुणे : लोकमान्य टिळक स्मारक ट्रस्टच्या (हिंद स्वराज्य संघ) वतीने देण्यात येणारा यंदाचा ४३ वा लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार, केंद्रीय भूपृष्ठ मंत्री नितीन गडकरी यांना जाहीर झाला आहे. टिळक स्मारक ट्रस्टचे अध्यक्ष डॉ. रोहित टिळक यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत पुरस्काराची घोषणा केली.

शुक्रवारी (१ ऑगस्ट) टिळक स्मारक मंदिरात सकाळी १०.३० वाजता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या उपस्थितीत पुरस्काराचे वितरण होणार असल्याचे डॉ. टिळक यांनी सांगितले.

डॉ. टिळक म्हणाले, ‘लोकमान्यांच्या चतुःसूत्रीतील स्वदेशीचा स्वीकार करत गडकरी यांनी रस्त्यांच्या माध्यमातून राष्ट्र उभारणीत मोठे कार्य सुरू केले आहे. विविध प्रकारच्या वाहन निर्मितीत स्वदेशीचा पुरस्कार व प्रसार त्यांच्याकडून होत आहे. देशाच्या विकासासाठी त्यांनी दिलेले योगदान लक्षात घेऊन त्यांची ४३ व्या लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कारासाठी निवड करण्यात आली.’

यावेळी लोकमान्य टिळक राष्ट्रीय सन्मान देऊन गौरविलेल्या आजवरच्या पुरस्कारार्थीच्या जीवन कार्याचा आढावा घेणारा इंग्रजी ग्रंथ तयार करण्यात आला आहे. या ग्रंथाचे प्रकाशन पुरस्कार वितरण सोहळ्यात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते करण्यात येणार आहे, असेही डॉ. टिळक यांनी नमूद केले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आतापर्यंंत ‘यांना’ पुरस्कार

 लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार १९८३ पासून देण्यास सुरुवात झाली. पहिला पुरस्कार एस.एम. जोशी यांना हा पुरस्कार देण्यात आला असून  आतापर्यंत पंतप्रधान नरेंद्र मोदी, कॉम्रेड डांगे, इंदिरा गांधी, डॉ. मनमोहन सिंग, अटलबिहारी वाजपेयी, प्रणव मुखर्जी, ज्येष्ठ नेते शरद पवार, राहुलकुमार बजाज, जी. माधवन नायर, एन. आर. नारायण मूर्ती, डॉ. शिवथाणू पिल्ले, माँटेकसिंग अहलुवालिया, डॉ. कोटा हरिनारायण, डॉ. के. सिवन, बाबा कल्याणी, डॉ. सायरस पुनावाला, सुधा मूर्ती यांच्यासह अन्य दिग्गजांना हा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले आहे.