पुणे : पुण्यात गुइलेन बॅरे सिंड्रोमची (जीबीएस) बाधा कॅम्पायलोबॅक्टर जेजुनी हा जीवाणू आणि नोरोव्हायरस या विषाणूमुळे झाल्याचे उघड झाले आहे. राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेने केलेल्या रुग्णांच्या नमुन्यांच्या तपासणीत हे निष्पन्न झाले आहे. दूषित अन्न व पाण्यातून हे जीवाणू आणि विषाणू पसरत असल्याने पुण्यातील रुग्णांना बाधा यामुळेच झाली असण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेकडे काही रुग्णांचे शौच व रक्तनमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. संस्थेने या रुग्णांच्या नमुन्यांचे तपासणी अहवाल आरोग्य विभागाला पाठविले आहेत. त्यात काही रुग्णांना कॅम्पायलोबॅक्टर जेजुनी हा जीवाणू आणि काही रुग्णांमध्ये नोरोव्हायरस हा विषाणू संसर्ग आढळून आला आहे. या दोन्हींचा संसर्ग दूषित अन्न अथवा पाण्यातून होतो. याचबरोबर या दोन्हीची लक्षणेही पोटदुखी, उलट्या आणि जुलाब ही आहेत.

जीवाणू अथवा विषाणू संसर्ग झाल्यानंतर ही रुग्णांमध्ये त्यांची प्रतिकारशक्ती जीवाणूऐवजी शरीरातील चेतासंस्थेवर हल्ला करते. त्यांना १ ते ३ आठवड्यांनी गुइलेन बॅरे सिंड्रोम होतो. हा चेतासंस्थेशी निगडित विकार आहे. त्यात शरीरातील प्रतिकारशक्तीच चेतासंस्थेवर हल्ला करते. त्यातून हात, पाय, गळा, तोंड आणि डोळे या भागात अशक्तपणा जाणवतो. हातापायाला मुंग्या येणे अथवा ते बधीर पडणे अशी लक्षणे दिसून येतात. रुग्णांना चालण्यासह अन्न गिळण्यात आणि श्वास घेण्यात अडचणी येतात. या विकारावर लक्षणांनुसार उपचार केले जातात. त्यात आयव्हीआयजी इंडेक्शन अथवा प्लाझ्मा बदलणे असे उपचार केले जातात. या विकाराचा रुग्ण योग्य उपचारानंतर बरा होतो.

नोरोव्हायरसचा संसर्ग कशामुळे?

जीबीएस रुग्णांमध्ये नोरोव्हायरसचा संसर्ग आढळून आला आहे. दरवर्षी जगभरात ६८ कोटींहून अधिक जणांना याचा संसर्ग होतो आणि त्यामुळे वर्षाला सुमारे २ लाख जणांचा मृत्यू होतो. हा विषाणू दूषित अन्न अथवा पाण्यातून पसरत असला तरी तो हवेतूनही त्याचा संसर्ग होऊ शकतो. बाधित रुग्णाने उलटी केल्यास त्यातून हा विषाणू हवेत पसरून इतरांना त्याचा संसर्ग होऊ शकतो. हा संसर्ग झाल्यानंतर रुग्ण १ ते ३ दिवसांत बरा होतो. काही रुग्णांमध्ये गुंतागुंत वाढत जाऊन गुइलेन बॅरे सिंड्रोम होतो.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

कॅम्पायलोबॅक्टर जेजुनीचा संसर्ग कसा होतो?

कॅम्पायलोबॅक्टर जेजुनी या जीवाणूचा संसर्ग दूषित अन्न अथवा पाण्यातून होतो. दरवर्षी जगभरात १० पैकी एका व्यक्तीला हा संसर्ग होतो. त्यात ५ वर्षांखालील लहान मुलांचे प्रमाण अधिक दिसून येते. या संसर्गामुळे मृत्यू होण्याचे प्रमाण अतिशय कमी आहे. हा संसर्ग झाल्यानंतर रुग्ण २ ते ५ दिवसांत बरा होतो. मात्र, काही रुग्णांमध्ये नंतर गुइलेन बॅरे सिंड्रोमची बाधा होते.