पुणे : हडपसरमधील सय्यदनगर भागात दहशत माजविणारा गुंड रिझवान उर्फ टिपू सत्तार पठाण याच्यासह साथीदारांची बँक खाती गोठविण्यात आली आहे. काळेपडळ पोलिसांनी पठणसह साथीदारांची घराची झडती घेतली. तेथून जमीन व्यवहारासंदर्भातील कागदपत्रे, महागडी मोटार, तीन दुचाकी, तसेच गृहोपयोगी वस्तू असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
टिपू पठाणने केलेल्या बेकायदा बांधकामावर काळेपडळ पोलिसांनी महापालिकेच्या मदतीने नुकतीच कारवाई केली होती. या कारवाईत पठाण याचे कार्यालय, तसेच बेकायदा बांधकाम पाडून टाकण्यात आले हाेते. या कारवाईनंतर पोलिसांनी पठाण याच्यासह दहा साथीदारांच्या घरावर पोलिसांनी छापा टाकला. त्यांच्या घरातून पंखे, दूरचित्रवाणी संच, धुलाई यंत्र, महागडे फर्निचर असा चार ते पाच लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पठाण आणि साथीदारांच्या नातेवाईकांनी महागड्या गृहोपयोगी वस्तू खरेदीची बिले सादर केली नाहीत.
पोलिसांनी पठाण याच्या घरातून दोन साठेखत जप्त केले आहेत. परिमंडळ पाचचे पोलीस उपायुक्त डाॅ. राजकुमार शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक मानसिंग पाटील, गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अमर काळंगे, सहायक निरीक्षक अमित शेटे, प्रवीण काळभोर, दाऊद सय्यद, प्रतीक लाहिगुडे, विशाल ठोंबरे, शाहीद शेख, लक्ष्मण काळे, अतुल पंधरकर, नितीन ढोले, सद्दाम तांबोळी, प्रदीप बेडीस्कर, महादेव शिंदे यांनी ही कारवाई केली.
हडपसरमधील सय्यदनगर परिसरात गुंड रिझवान उर्फ टिपू सत्तार पठाण याची दहशत आहे. त्याच्याविरुद्ध वानवडी, हडपसर पोलीस ठाण्यात गंभीर गुन्हे दाखल आहेत. पठाणने एका महिलेला धमकावून तिच्या जमिनीचा बेकायदा ताबा घेतला होता. महिलेने याबाबत पोलिसांकडे तक्रार दिली होती. पठाणने एका कार्यक्रमात नोटाही उधळल्या होत्या. पठाण याच्या दहशतीमुळे नागरिक तक्रार देण्यास पुढे येत नव्हते. पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी पठाण याच्यासह १६ साथीदारांविरुद्ध महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यान्वये (मकोका) कारवाई करण्याचे आदेश दिले. त्यानंतर पठाणसह साथीदारांना अटक करून त्यांची रवानगी कारागृहात करण्यात आली.
दरम्यान, पठाण टाेळीतील पसार साथीदार शाहरूक उर्फ हट्टी याचा मोहोळ तालुक्यातील लांबोटी गावात पोलिसांशी झालेल्या चकमकीत मृत्यू झाला होता. पठाण याची कोथरूडमधील गुंड गजानन उर्फ गजा मारणे याच्याशी जवळीक आहे. पठाणने मारणेसोबत काढलेली छायाचित्रे आणि चित्रफीत समाज माध्यमात प्रसारित केली होती.