पुणे: पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपीएमएल) बसमध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित (एआय) कॅमेऱ्यांची चाचणी यशस्वी ठरली आहे. आता सर्व बसमध्ये ‘एआय’ कॅमेरे बसविण्यासाठीचा प्रस्ताव केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाकडे पाठविण्यात आला आहे. या प्रस्तावाला मान्यता मिळाल्यानंतर ‘पीएमपी’चा प्रवासी सेवेचा दर्जा सुधारण्यास आणि गैरप्रकार रोखण्यास मदत होणार आहे. येत्या काही दिवसांत दिल्लीतील शिष्टमंडळासमोर याचे सादरीकरण करण्यात येणार आहे.

मंत्रालयाकडून परवानगी प्राप्त होताच सर्व बसमध्ये ‘एआय’ कॅमेरे बसविण्यात येणार असून, त्यासाठी सुमारे चार कोटींचा खर्च अपेक्षित असल्याची माहिती ‘पीएमपी’ प्रशासनाकडून देण्यात आली.

‘निवडक बसमध्ये ‘एआय’ आधारित कॅमेरे बसवून नुकतीच चाचणी घेण्यात आली. ही चाचणी विनाअडथळा यशस्वी ठरली. पीएमपीचा दर्जा सुधारून अपघात आणि वेगावर नियंत्रणही ठेवण्यात येणार आहे. तसेच, चालक, वाहक आणि प्रवाशांच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यात येणार आहे,’ अशी माहिती ‘पीएमपी’च्या अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक दीपा मुधोळ-मुंडे यांनी दिली.

प्रत्येक बसमध्ये दोन ‘एआय’ कॅमेरे

पीएमपीच्या प्रत्येक बसमध्ये दोन ‘एआय’ कॅमेरे लावण्यात येणार आहेत. त्यांपैकी पहिला कॅमेरा चालकाच्या ‘स्टिअरिंग’जवळ, तर दुसरा कॅमेरा बसमधील शेवट्या भागात लावण्यात येणार आहे. त्यामुळे चालकाच्या हालचालीपासून बसमध्ये प्रवासी प्रवेश करण्यापासून उतरेपर्यंतचे सर्व चित्रीकरण याद्वारे होईल. तसेच बसमध्ये ‘जीपीएस’ असल्याने बस कोठे, किती वेगाने संचलन करत आहे, यावर नियंत्रण कक्षातून बारकाईने लक्ष ठेवण्यात येणार आहे.

कॅमेऱ्यांचा फायदा

– विनातिकीट प्रवास करणाऱ्यांवर लक्ष राहणार

– प्रवाशांची संख्या तातडीने मोजून संबंधित संदेश नियंत्रण कक्षाला समजणार

– चालकाच्या चेहऱ्यावरील हावभाव टिपले जाणार असून, वेगमर्यादेवर नियंत्रण ठेवण्यास मदत

– चालकाची मानसिक, शारीरिक स्थिती सुस्पष्ट होणार

– वादविवादाच्या पार्श्वभूमीवर पुरावा म्हणून उपयोग

– संचलनातील त्रुटी आणि अडथळे दूर करता येणे शक्यकोट

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

‘पीएमपी’ प्रवासाभिमुख आणि सक्षम करण्यासाठी बसमध्ये ‘एआय’ कॅमेरे लावण्याचा निर्णय घेण्यात आला. याबाबतची चाचणी यशस्वी झाली असून, संबंधित अहवाल केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाकडे पाठवला आहे. मंजुरी मिळताच याबाबत कार्यवाही केली जाणार आहे.– दीपा मुधोळ-मुंडे, अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक, पीएमपी