लोकसत्ता प्रतिनिधी

पिंपरी : गुईलेन बॅरे सिंड्रोम (जीबीएस) या आजाराचे निदान करण्यासाठीची ‘एनसीव्ही’ चाचणी महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालय (वायसीएम) आणि नवीन थेरगाव रुग्णालयात मोफत केली जाणार आहे. या आजाराची माहिती देण्यासाठी हेल्पलाइन सुरू करण्यात येणार आहे.

गुईलेन बॅरे सिंड्रोम (जीबीएस) या आजाराचे शहरात १५ संशयित रुग्ण आढळून आले आहेत. पिंपरी, वाकड, भोसरी, पिंपळेगुरव, चिखली, तळवडे या भागात रुग्ण आढळले आहेत. या भागातील पिण्याच्या पाण्याची तपासणी करण्यासाठी नमुने पुण्यातील सार्वजनिक आरोग्य प्रयोगशाळेत पाठविले आहेत. विहिरी, बोरवेल, टँकर मार्फत पिण्यासाठी वापरल्या जाणा-या पाण्याचे ‘क्लोरीन’ तपासले जाणार आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

शहरातील खासगी रुग्णालयांकडे ‘इम्युनोग्लोब्यूलिन’ इंजेक्शन नसल्यास त्यांनी गुईलेन बॅरे सिंड्रोमच्या रुग्णांना दाखल करून घेऊ नये, महापालिकेच्या रुग्णालयात पाठविण्याच्या सूचना दिल्या आहेत. शहरातील रुग्णवाढ स्थिर आहे. या आजाराचे रुग्ण आढळून आलेल्या परिसराचे सर्वेक्षण सुरू आहे. आठ रुग्णालय विभागाअंतर्गत प्रत्येकी दोन असे एकूण १६ पथके तयार करण्यात आली आहेत. या पथकांमार्फत घरांची तपासणी केली जात असल्याचे आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. लक्ष्मण गोफणे यांनी सांगितले.