शासकीय, अभिमत, खासगी अशी ३० हून अधिक विद्यापीठे, अभियांत्रिकीसह अनेक अभ्यासक्रम असणारी महाविद्यालये पुणे आणि परिसरात आहेत. पूर्वीपासून ‘ऑक्सफर्ड ऑफ द ईस्ट’ किंवा ‘विद्येचे माहेरघर’ असा पुण्याचा लौकिक आहे. मात्र, राष्ट्रीय पातळीवर एनआयआरएफ क्रमवारीतील वेगवेगळ्या गटांमध्ये पुणे आणि परिसरातील अगदीच मोजक्या संस्था स्थान मिळवत असल्याचे यापूर्वीही दिसून आले आहे, यंदा तर ते अधोरेखितच झाले. त्यामुळे एकीकडे नवनवी विद्यापीठे, महाविद्यालये संख्येने वाढत असताना गुणात्मक वाढीचे काय, पुणे हे विद्येचे माहेरघर खरोखरच राहिले आहे का, असे प्रश्न निर्माण होत आहे.
केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने नुकतीच राष्ट्रीय संस्थात्मक क्रमवारी आराखडा (एनआयआरएफ) या अंतर्गत देशभरातील उच्च शिक्षण संस्थांची क्रमवारी नुकतीच जाहीर केली. त्यात पुणे आणि परिसरातील काही उच्च शिक्षण संस्थांनी स्थान प्राप्त केले आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत काही शिक्षण संस्थांची घसरण झाली आहे, तर काहींनी स्थान उंचावले आहे. क्रमवारीतील विविध क्रमवारीचा आढावा घेतला असता, आघाडीच्या संस्थांमध्ये पुण्यातील मोजक्याच संस्था दिसून येतात. सर्वसाधारण गटात सिम्बायोसिस आंतरराष्ट्रीय विद्यापीठ ४०व्या, भारतीय विज्ञान शिक्षण आणि संशोधन संस्था (आयसर पुणे) ५५व्या, डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठ ७१व्या, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ ९१व्या स्थानी आहे.
विद्यापीठ गटात सिम्बायोसिस विद्यापीठ २४व्या, डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठ ४१व्या, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ ५६व्या, भारतीय विद्यापीठ अभिमत विश्वविद्यालय ५९व्या स्थानी आहे. महाविद्यालय गटात केवळ फर्ग्युसन महाविद्यालयालाच स्थान मिळवता आले असून, ते ५६व्या स्थानी आहे. संशोधन संस्थांच्या गटातही केवळ आयसर पुणे या एकमेव संस्थेचा समावेश आहे. आयसर पुणे ३५व्या स्थानी आहे.
अभियांत्रिकी गटात सिम्बायोसिस विद्यापीठ ४६व्या, सीओईपी तंत्रशास्त्र विद्यापीठ ९०व्या, संरक्षण प्रगत तंत्रज्ञान संस्था (डाएट) ९२व्या स्थानी आहे. व्यवस्थापन गटात सिम्बायोसिस इन्स्टिट्यूट ऑफ बिझनेस मॅनेजमेंटला ११वा, औषधनिर्मितीशास्त्र गटात पूना कॉलेज ऑफ फार्मसीला ३४वा, डॉ. डी. वाय. पाटील फार्मास्युटिकल सायन्स अँड रीसर्चला ३५व्या, डॉ. विश्वनाथ कराड विश्वशांती विद्यापीठाला ७०वा, मॉडर्न कॉलेज ऑफ फार्मसी ९२वा, वैद्यकीय गटात डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठाला १२वा, दंतवैद्यकीय गटात डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठाला चौथा, विधी शिक्षण गटात सिम्बायोसिस लॉ स्कूलला सातवा, राज्य विद्यापीठ गटात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाला ११वा, सीओईपी तंत्रशास्त्र विद्यापीठाला ४३वा क्रमांक, कौशल्य विद्यापीठ गटात सिम्बायोसिस कौशल्य आणि व्यावसायिक विद्यापीठाला पहिला क्रमांक मिळाला आहे. तर, वास्तुकला, नवसंकल्पना (इनोव्हेशन), मुक्त विद्यापीठ, कृषी आणि संबंधित क्षेत्रे, शाश्वत विकास उद्दिष्टे अशा गटांमध्ये पुणे आणि परिसरातील एकाही विद्यापीठ, महाविद्यालयाला स्थान मिळवता आलेले नाही.
गेल्या काही वर्षांत शिक्षणाच्या क्षेत्रात प्रचंड स्पर्धा निर्माण झाली आहे. ही स्पर्धा केवळ विद्यार्थ्यांपुरतीच नाही, तर शिक्षण संस्थांमध्येही आहे. पुणे शहर आणि परिसरात एक-दोन वर्षे ते दोनशे वर्षे जुनी विद्यापीठे, महाविद्यालये आहेत. अशा वेळी ढोबळमानाने गुणवत्तेचे मोजमाप करण्यासाठी क्रमवारी महत्त्वाची ठरते. क्यूएस, टाइम्स हायर एज्युकेशन या आंतरराष्ट्रीय क्रमवारी आणि एनआयआरएफ क्रमवारी यांच्या निकषांमध्ये, मूल्यमापन पद्धतीमध्ये फरक आहे. आंतरराष्ट्रीय क्रमवारी जरा बाजूला ठेवल्या, तरी एनआयआरएफसारख्या राष्ट्रीय क्रमवारीत तरी आघाडीचे स्थान मिळवण्याची भूक महाविद्यालये, विद्यापीठांमध्ये आहे की नाही असा प्रश्न क्रमवारी पाहून पडतो.
शासकीय, अनुदानित महाविद्यालये, विद्यापीठे यांच्यावर सरकारच्या धोरणांचे निर्बंध असतात. त्यामुळे प्राध्यापकांची पुरेशी संख्या शासकीय, अनुदानित महाविद्यालये-विद्यापीठांमध्ये नाही. त्याचा परिणाम संशोधनासह अनेक पातळ्यांवर होतो. मात्र, ती बाब खासगी विद्यापीठांना लागू नाही. असे असूनही पुणे आणि परिसरातील अनेक खासगी विद्यापीठांपैकी मोजकीच विद्यापीठे क्रमवारीत दिसतात. काही विद्यापीठे अगदी नवीन आहेत, हा भाग बाजूला ठेवला, तरी बाकीच्यांचे काय? एकीकडे गुणवत्तापूर्ण शिक्षण, संशोधनाला चालना अशा मोठमोठ्या गप्पा मारल्या जात असताना त्याचे प्रतिबिंब क्रमवारीत उमटताना दिसत नाही. मग कुठे आणि काय चुकते आहे याचा गांभीर्याने विचार करण्याची वेळ आली आहे. त्याशिवाय किती महाविद्यालये, विद्यापीठे एनआयआरएफ क्रमवारीमध्ये सहभागी होतात, किती गांभीर्याने माहिती सादर करतात हे प्रश्नही आहेतच. ते असो…
राज्याच्या कानाकोपऱ्यांतून, परराज्यांतून, अगदी परदेशातूनही शिक्षणासाठी विद्यार्थी मोठ्या संख्येने पुण्यातील शिक्षण संस्थांमध्ये प्रवेश घेतात. देशातील शिक्षणाच्या महत्त्वाच्या केंद्रांमध्ये पुण्याचा समावेश आहे. मात्र, बदलत्या काळात शैक्षणिक परिसंस्था आणखी सक्षम करण्यासाठी महाविद्यालये, विद्यापीठांनी प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी एनआयआरएफसारख्या क्रमवारीत सर्वोत्कृष्ट संस्थांमध्ये स्थान मिळवण्याला पर्याय नाही. अधिकाधिक विद्यापीठे, महाविद्यालयांनी देशात सर्वोत्कृष्ट संस्थांच्या यादीत स्थान मिळवले, तरच विद्येचे माहेरघर ही पुण्याची बिरुदावली सार्थ ठरेल. केवळ नवी महाविद्यालये, विद्यापीठे सुरू होऊन शैक्षणिक परिसंस्थेचा संख्यात्मक विस्तार होईल, गुणात्मक विस्ताराकडे दुर्लक्ष होऊन काहीच उपयोग नाही.
chinmay.patankar@expressindia.com