‘महाराष्ट्र गव्हर्नमेंट नर्सेस फेडरेशन’च्या वीस हजार परिचारिकांनी विविध मागण्यांसाठी बुधवारी एक दिवसाचा लाक्षणिक संप केला. सार्वजनिक आरोग्य विभागातील परिचारिकांच्या विनाकारण बदल्या करु नयेत व बंधपत्रित परिचारिकांना सरळ सेवेत सामावून घ्यावे, अशा संघटनेच्या प्रमुख मागण्या आहेत.

पुण्यात ससून रुग्णालयासह, औंध जिल्हा रुग्णालय, क्षयरोग (उरो) रुग्णालय, येरवडा मनोरुग्णालय आणि मोहननगरच्या राज्य कामगार विमा योजनेच्या रुग्णालयातील परिचारिका संपावर होत्या. ग्रामीण भागातील परिचारिकाही संपावर गेल्या होत्या, अशी माहिती संघटनेच्या अध्यक्ष अनुराधा आठवले यांनी दिली.

वैद्यकीय शिक्षण विभागाने परिचारिकांसाठी बदामी रंगाच्या गणवेशाचे आदेश काढावेत, परिचारिकांना कारकुनी कामे न देता रुग्णसेवेचेच काम द्यावे, अशा मागण्याही संघटनेने मांडल्या  आहेत.

ससून रुग्णालयाचे अधीक्षक अजय तावरे म्हणाले,‘‘ आम्ही बुधवारी ‘नॉन क्लिनिकल’ व ‘पॅरा क्लिनिकल’ मनुष्यबळ, तसेच पुणे पालिकेकडील काही परिचारिकांची मदत घेतली. त्यामुळे सेवा सुरळित होती.’’