पुणे : ऐन मे महिन्यात पावसाने झोडपण्याचे सत्र बुधवारीही कायम राहिले. शहरातील काही भागांत जोरदार सरी बरसल्या असून, हवामान विभागाने दिलेल्या आकडेवारीनुसार रात्री सव्वादहापर्यंत एनडीए येथे १०३ मिलीमीटर, तर मगरपट्टा येथे ५४.४ मिलीमीटर पावसाची नोंद झाली.
गेल्या चार दिवसांत शहर आणि परिसरातील पावसाची तीव्रता वाढली आहे. हवामान विभागाने पुणे आणि परिसरासाठी ऑरेंज अलर्ट दिला होता. त्यानुसार शहर आणि परिसरात पावसाच्या जोरदार सरी कोसळत आहेत. बुधवारीही शहर आणि परिसरात मुसळधार पावसाची नोंद झाली. त्यानुसार एनडीए येथे १०३ मिलीमीटर,मगरपट्टा येथे ५४.५, हडपसर येथे २१.५, तळेगाव येथे १५.५, कोरेगाव पार्क येथे १०.५ मिलीमीटर पावसाची नोंद झाल्याची माहिती हवामान विभागाने दिली. तसेच २७ मेपर्यंत आकाश ढगाळ राहून हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाचा अंदाजही वर्तवण्यात आला आहे.
उत्तर कर्नाटक ते गोवा किनारपट्टीलगत कमी दाबाचा पट्टा तयार होण्याची शक्यता आहे. तो पुढील ४८ तास उत्तरेकडे सरकून त्याची तीव्रता आणखी वाढू शकते, अशी माहिती हवामान विभागाचे निवृत्त शास्त्रज्ञ अनुपम कश्यपी यांनी दिली.