पिंपरी- चिंचवड : दापोडी परिसरामध्ये केवळ रागाने बघितल्याच्या क्षुल्लक कारणास्तव एकाची कोयत्याने वार करून हत्या करण्यात आली. ही घटना रात्री ११ च्या सुमारास घडली. घटनेनंतर अवघ्या काही तासांत दापोडी पोलिसांनी आरोपींना अटक केली आहे.

शेखर भालेराव असे हत्या झालेल्या ???तरुणाचे (वय- ?)??? नाव आहे. या प्रकरणी गौरव गायकवाड आणि अजय खरात या दोघांना दापोडी पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. सुदाम भागू भालेराव यांनी दापोडी पोलिसांत यासंबंधीची तक्रार दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ज्याची हत्या झाली तो शेखर भालेराव आणि गौरव गायकवाड, अजय खरात हे आरोपी एकमेकांच्या परिचयाचे होते. त्यांच्यात अनेकदा किरकोळ कारणावरून वाद झाले होते. आठ दिवसांपूर्वी रागाने बघण्यावरूनही तिघांच्यात किरकोळ वाद झाला होता. ??? शुक्रवारी (ता. ?)??? रात्री ११ च्या सुमारास याच रागातून गौरव व अजय यांनी बेसावध असलेल्या शेखर भालेरावच्या डोके आणि पाठीवर कोयत्याने निर्घृण पद्धतीने वार करून, त्याची हत्या केली. गंभीर जखमा झालेल्या अवस्थेतील शेखरचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडला होता. त्याला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले; परंतु तोपर्यंत बराच उशीर झाला होता.

घटनेनंतर दापोडी पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली. परिणामत: अवघ्या काही तासांत गौरव आणि अजयला अटक करण्यात पोलिसांना यश आले. केवळ रागाने बघण्यावरून हत्या करण्यात आल्याची कबुली आरोपींनी पोलिसांना दिली आहे. या घटनेचा अधिक तपास दापोडी पोलीस करीत आहेत.