पुणे : राज्यात गुइलेन बॅरे सिंड्रोमच्या (जीबीएस) आणखी एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. पुण्यातील ससून सर्वोपचार रुग्णालयात रुग्णाच्या मृत्यूची नोंद झाली आहे. यामुळे राज्यात आतापर्यंत मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या १२ झाली आहे. दरम्यान, राज्यातील जीबीएसची रुग्णसंख्या २२५ वर पोहोचली आहे.

पुण्यातील ससून रुग्णालयात ३८ वर्षीय पुरुषाचा जीबीएसने ३ मार्चला दुपारी मृत्यू झाला. तो मांजरीतील रहिवासी होता. या रुग्णाला २६ फेब्रुवारीला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तो गेल्याच महिन्यात पश्चिम बंगालमधून पुण्यात आला होता. त्याची प्रकृती बिघडल्याने त्याला स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर त्याला ससून रुग्णालयात हलविण्यात आले. त्याच्या चाचण्यांमध्ये जीबीएसचे निदान झाले होते. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. आतापर्यंत जीबीएसमुळे १२ जणांचा मृत्यू झाला आहे. जीबीएसच्या पहिल्या रुग्णाचा मृत्यू सोलापूरमध्ये झाला. हा रुग्ण पुण्यातून सोलापूरला गेला होता. त्यानंतर पुण्यात १० आणि पिंपरी-चिंचवडमध्ये एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती आरोग्य विभागाने दिली.

राज्यात जीबीएसचे आतापर्यंत २२५ रुग्ण आढळून आले असून, त्यातील १९७ रुग्णांचे जीबीएस निदान झाले आहे. पुण्यातील जीबीएस रुग्णसंख्येतील वाढ सुरूच असून, पुणे महापालिका ४६, महापालिकेत नव्याने समाविष्ट गावे ९५, पिंपरी-चिंचवड महापालिका ३३, पुणे ग्रामीण ३७ अशी रुग्णसंख्या आहे. राज्यात इतर जिल्ह्यांत आतापर्यंत १४ रुग्ण आढळून आले आहेत. राज्यात आढळलेल्या एकूण रुग्णांपैकी २४ जणांवर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. याचबरोबर १५ रुग्ण व्हेंटिलेटरवर आहेत. राज्यभरात १७९ रुग्णांना उपचार करून घरी सोडण्यात आले आहे, असे आरोग्य विभागाने स्पष्ट केले.

जीबीएसचा उद्रेक

एकूण रुग्णसंख्या – २२५

रुग्णालयात दाखल – ३४

अतिदक्षता विभागात – २४

व्हेंटिलेटरवर – १५

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मृत्यू – १२