पुणे : राज्यातील समूह साधन केंद्र समन्वयकपदासाठी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे १ ते ५ डिसेंबर या कालावधीत ऑनलाइन परीक्षा घेतली जाणार आहे. एकूण २ हजार ४१० पदांसाठी ही स्पर्धा परीक्षा घेतली जाणार असून, या पदासाठी शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) पात्र होणे अनिवार्य आहे. दोन वर्षांच्या खंडानंतर पुन्हा या पदासाठीच्या परीक्षेची घोषणा करण्यात आली आहे.
राज्य परीक्षा परिषदेच्या आयुक्त अनुराधा ओक यांनी याबाबतचे परिपत्रक प्रसिद्ध केले आहे. राज्यातील सर्व जिल्हा परिषदांतील समूह साधन केंद्रातील (केंद्रशाळा) केंद्रप्रमुख किंवा समन्वयक पदासाठी ‘समूह साधन समन्वयक (केंद्रप्रमुख) मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा २०२५’ ही परीक्षा ऑनलाइन पद्धतीने आयोजित करण्यात येणार आहे. या पदासाठी राज्य परीक्षा परिषदेतर्फे २०२३मध्येच परीक्षा घेतली जाणार होती. मात्र, त्या वेळी परीक्षा होऊ शकली नाही. त्यामुळे २०२३मधील परीक्षेवेळी अर्ज भरलेल्या उमेदवारांना ८ ते १८ ऑगस्ट या कालावधीत अर्ज भरता येणार आहे. तर, नवीन उमेदवारांना २५ ऑक्टोबर ते १० नोव्हेंबर या कालावधीत अर्ज करता येणार आहे. परीक्षा शुल्क ऑनलाइन पद्धतीने भरण्यासाठी १० नोव्हेंबर ही अंतिम मुदत आहे. अधिक माहिती http://www.mscepune.in/ या संकेतस्थळावर देण्यात असल्याचे परीक्षा परिषदेने नमूद केले आहे.
परीक्षा परिषदेच्या परिपत्रकानुसार सातारा जिल्ह्यात १११, पुणे जिल्ह्यात १५१, नाशिक जिल्ह्यात १२२, रत्नागिरी जिल्ह्यात १२५, अहिल्यानगर जिल्ह्यात १२३, रायगड जिल्ह्यात ११४ पदे उपलब्ध आहेत. त्याशिवाय अन्य जिल्ह्यांमध्येही पदे उपलब्ध आहेत. या पदासाठीची शैक्षणिक आणि व्यावसायिक पात्रता १८ जुलै २०२५ रोजीच्या शासन निर्णयानुसार निश्चित करण्यात आली आहे. या पदासाठी जिल्हा परिषद शाळांत कार्यरत शिक्षक पात्र आहेत. तसेच प्रशिक्षक पदवीधर शिक्षक (प्राथमिक) किंवा प्रशिक्षित शिक्षक (प्राथमिक) या पदावर किमान सहा वर्षे अखंडित सेवा पूर्ण असणे आवश्यक आहे. यासाठी शिक्षण सेवक पदावरील सेवा ग्राह्य धरण्यात येईल.
परीक्षेसाठी उमेदवार ज्या जिल्हा परिषदेमध्ये कार्यरत असेल, त्याच जिल्ह्यातील निवडीसाठी पात्र राहील. परीक्षेमध्ये १०० गुणांसाठी बुद्धिमत्ता आणि अभियोग्यता, १०० गुणांसाठी शालेय शिक्षणातील नियम, अधिनियम, शैक्षणिक नवविचार प्रवाह असे विषय असतील, असे नमूद करण्यात आले आहे.