लोकसत्ता प्रतिनिधी

पिंपरी : क्रेडीट कार्डवरील विमा नको असल्यास प्रोसेस करून ओटीपी नंबर सांगण्यास भाग पाडून त्याद्वारे एका तरुणाची ९० हजार ७८० रुपयांची फसवणूक केली. ही घटना पिंपरीतील संत तुकारामनगर, येथे १० ऑक्टोबर २०२३ रोजी दुपारी साडेबाराच्या सुमारास घडली. याबाबत तब्बल दीड वर्षांनंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत २७ वर्षीय तरुणाने संत तुकारामनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १० ऑक्टोबर २०२३ रोजी फिर्यादी यांच्या मोबाइल क्रमांकावर आरोपीने फोन केला. नेहा शर्मा नाव सांगणार्‍या महिलेने आपण अ‍ॅक्सीस बँकेच्या क्रेडीट कार्ड विभागातून मीरा भाईंदर येथून बोलत असल्याचे सांगितले. तुमच्याकडे अ‍ॅक्सीस बँकेचे क्रेडीट कार्ड आहे का ? व त्याचा विमा आहे का ? अशी विचारणा केली. फिर्यादी यांनी क्रेडीट कार्डवर विमा असल्याचे सांगून त्याची मुदत संपत आल्याचे सांगितले. जर विमा पुढे सुरू ठेवायचा असेल तर ४० हजार रुपये शुल्क भरावे लागेल, असे सांगितले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

फिर्यादी यांचा विश्वास संपादन करण्यासाठी तिने फिर्यादी यांच्या अ‍ॅक्सीस बँकेच्या क्रेडीट कार्डचा क्रमांक फिर्यादी यांना सांगितला. फिर्यादी यांनी विमा नको असल्याचे सांगितले. विमा नको असेल तर आमच्याकडून एक प्रोसेस असून ती आम्ही करतो, असे सांगून फिर्यादी यांच्या मोबाईलवर ओटीपी पाठवून तो फिर्यादी यांना सांगण्यास भाग पाडले. त्यानंतर फिर्यादी यांच्या अ‍ॅक्सीस बँकेच्या क्रेडीट कार्डवरुन ९० हजार ७८० रुपये इतकी रक्कम फिर्यादीच्या संमतीशिवाय डेबीट करुन फिर्यादी यांची आर्थिक फसवणुक केली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक गोरख कुंभार तपास करीत आहेत.