महिलांनी स्वसंरक्षणासाठी सोबत मिरची पूड, स्प्रे जवळ ठेवावे. त्याचबरोबर एक छोटासा चाकू ठेवून सोनसाखळी चोरटे अथवा इतर कोणी तुमच्या अंगावर येत असेल तर त्याच्यावर हल्ला करा. पोलीस तुमच्यावर काहीच कारवाई करणार नाहीत, असा सल्ला पोलीस आयुक्त गुलाबराव पोळ यांनी पुन्हा एकदा दिला.
शहर पोलिसांनी चोरटय़ांकडून जप्त केलेला मुद्देमाल संबंधित नागरिकांना परत देण्यासाठी पिंपरी आणि निगडी पोलीस ठाण्यात कार्यक्रमाचे आयोजन केले होते, त्या वेळी पोळ बोलत होते. गेल्या वर्षीही पोळ यांनी महिलांना असाच सल्ला दिला होता. या प्रसंगी सहायक पोलीस आयुक्त स्मिता पाटील, शिवाजी शेलार, उपमहापौर राजू मिसाळ, पक्षनेता मंगला कदम, शिवसेनेचे बाबा धुमाळ, पोलीस अधिकरी उपस्थित होते. या वेळी पोळ यांनी महिलांच्या समस्या जाणून घेतल्या.
पोळ म्हणाले की, सोन्याचे भाव वाढल्यामुळे सोनसाखळी चोरीच्या घटना वाढल्या आहेत. घरफोडी आणि लुटमार करण्यापेक्षा हे गुन्हे सोपे असल्यामुळे गुन्हेगार सोनसाखळी चोरी करत आहेत. त्यामुळे घटनांमध्ये वाढ होत आहे. हे गुन्हेगार बाहेरून येतात आणि सोनसाखळी चोरी करून परत निघून जातात. महिलांनी स्वत:च काळजी घेतल्यास या गुन्ह्य़ांना आळा बसेल. शाळा, महाविद्यालयात तरुणींच्या छेडछाडीचे प्रकार वाढले आहेत. त्यामुळे या ठिकाणी जाऊन पालक, विद्यार्थी आणि मुख्याध्यापकांबरोबर चर्चा करा, अशा सूचनाही अधिकाऱ्यांना पोळ यांनी दिल्या.
संग्रहित लेख, दिनांक 5th Jan 2014 रोजी प्रकाशित
महिलांनो, चोरटय़ांचा प्रतिकार चाकूने करा! – पोलीस आयुक्तांचा पुन्हा सल्ला
महिलांनी स्वसंरक्षणासाठी सोबत मिरची पूड, एक छोटासा चाकू ठेवून सोनसाखळी चोरटे अथवा इतर कोणी तुमच्या अंगावर येत असेल तर त्याच्यावर हल्ला करा.असा सल्ला पोलीस आयुक्त गुलाबराव पोळ यांनी दिला.
First published on: 05-01-2014 at 03:30 IST
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Oppose thieves with knife gulabrao pol