पुणे : भाजप पदाधिकाऱ्याकडून महिला पोलीस अधिकाऱ्याचा विनयभंग केल्याचा प्रकार उघडकीस आल्यानंतर महायुतीतील मित्रपक्षासह विरोधकांनीही भाजपला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. भाजपचा मित्रपक्ष शिवसेना (शिंदे) आणि काँग्रेसने भाजपला ‘लक्ष्य’ केले आहे.
केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या पुणे दौऱ्यावेळी, बंदोबस्तावर असलेल्या वरिष्ठ महिला पोलीस अधिकाऱ्याचा भाजपचे शहर सरचिटणीस प्रमोद कोंढरे यांनी विनयभंग केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी फरासखाना पोलीस स्थानकामध्ये कोंढरे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, कसब्याचे आमदार हेमंत रासने यांच्या उपस्थितीतच हा प्रकार घडल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
या प्रकारानंतर महायुतीतील मित्रपक्ष शिवसेनेचे (शिंदे) महानगर प्रमुख, माजी आमदार रवींद्र धंगेकर यांनी भाजपवर टीका केली आहे. ‘राज्यात महायुतीचे सरकार आहे. त्याचे भान आहे. मात्र, भाजप पदाधिकारी हे महिला अधिकाऱ्याचा विनयभंग करत असेल, तर शिवसेना गप्प बसणार नाही.
कोंढरे यांनी यापूर्वीही राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका महिला पदाधिकाऱ्याचा विनयभंग केला होता. त्यावेळीही त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला होता. त्यामुळे विनयभंगाचे प्रकरण दाबले जाणार नाही, याची काळजी घेत त्याचा पाठपुरावा केला जाईल. कसब्याचे आमदार हेमंत रासने यांच्या उपस्थितीतच हा प्रकार घडल्याने त्यांनीही यासंदर्भातील मौन सोडावे,’ असे धंगेकर म्हणाले.
भाजप पदाधिकाऱ्याने वरिष्ठ महिला अधिकाऱ्याचा विनयभंग केल्याची घटना निषेधार्ह आहे. भाजपच्याच ओंकार कदम नावाच्या पदाधिकाऱ्याने महापालिकेतील एका महिला अधिकाऱ्याचा विनयभंग करून धमकी दिली होती. त्यावेळीही पोलीस प्रशासनाने तोंडदेखली कारवाई केली होती. महिलांना अपमानास्पद, तुच्छतेची वागणूक देणे हे भारतीय जनता पक्षाचे संस्कारच आहेत. त्यामुळे भाजप आणि पोलीस प्रशासनाच्या या कृतीचा निषेध करण्यासाठी कसबा गणपतीलाच निवेदन देण्यात येणार आहे, असे काँग्रेसचे शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांनी सांगितले.