scorecardresearch

पुण्यात पावसाचा ॲारेंज अलर्ट; आणखी चार ते पाच दिवस मुसळधारांचा इशारा

अरबी समुद्रातून वाहणाऱ्या बाष्पयुक्त वाऱ्यामुळे मुंबईसह संपूर्ण कोकण विभाग आणि पश्चिम महाराष्ट्रात सध्या जोरदार पाऊस सुरू आहे.

rain
(संग्रहीत छायाचित्र)

पुणे : अरबी समुद्रातून वाहणाऱ्या बाष्पयुक्त वाऱ्यामुळे मुंबईसह संपूर्ण कोकण विभाग आणि पश्चिम महाराष्ट्रात सध्या जोरदार पाऊस सुरू आहे. पुणे, पिंपरी- चिंचवड शहर आणि परिसरातही पावसाने जोर धरला आहे. पुणे शहर आणि परिसरात आणखी चार ते पाच दिवस जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला असून ॲारेंज ॲलर्टचा इशारा दिला आहे. जिल्ह्याच्या घाट विभागात काही ठिकाणी अतिवृष्टी होण्याचा इशाराही देण्यात आला आहे.

 पुणे शहर आणि परिसरामध्ये मोसमी पाऊस दाखल झाल्यापासून पावसाच्या तुरळक ते मध्यम स्वरूपाच्या सरी कोसळल्या होत्या. मात्र, मंगळवारपासून शहरात पावसाने जोर धरला आहे. बुधवारी सकाळपर्यंत शहर आणि परिसरात पावसाच्या जोरदार सरी सुरू होत्या. सकाळपर्यंत पुण्याच्या शिवाजीनगर केंद्रात २५ मिलिमीटरपर्यंत पावसाची नोंद झाली. जिल्ह्यात सर्वाधिक पाऊस लोणावळा परिसरात १८५ मिलिमीटर इतका झाला. त्या पाठोपाठ लवासा केंद्रावर १७०, तर चिंचवडमध्ये ५४ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. शहराला पाणीपुरवठा होत असलेल्या खडकवासला धरणसाखळीतही चांगल्या पावसाची नोंद होत आहे. हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार संपूर्ण पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणात पुढील पाच दिवस मुसळधार पाऊस ते अतिवृष्टी होण्याचा इशारा देण्यात आला आहे. पुणे शहरात चार दिवस पावसाचा जोर कायम राहणार आहे.

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Orange alert for rain in pune four to five days torrential downpour pune print news ysh