अखिल भारतीय ब्राह्मण महासंघातर्फे २५ फेब्रुवारी ते १ मार्च २०२३ या दरम्यान दिल्ली येथे ब्रह्मोद्योग २०२३ या राष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात येणार आहे. संस्थेचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. गोविंदजी कुलकर्णी यांच्या संकल्पनेतून साकारलेले ब्रम्होद्योग हे ब्राह्मण समाजातील विविध व्यावसायिक घटकांना एकत्र आणणारे राष्ट्रीय स्तरावरील व्यासपीठ आहे, अशी माहिती पिंपरी- चिंचवड च्या अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाने दिली आहे.
हेही वाचा- पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ अधिसभेवर रोहित पवार, माधुरी मिसाळ यांची नियुक्ती
यापूर्वी औरंगाबाद व पुणे येथे ब्रह्मोद्योगचे यशस्वी आयोजन करण्यात आले होते. दिल्ली येथे ब्रम्होद्योग २०२३ चे आयोजन करण्याचा मुख्य हेतू म्हणजे, अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ करीत असलेले कार्य देशातील देशाच्या कानाकोपऱ्यापर्यंत पोहोचून देशातील सर्व ज्ञाती बांधवांना एकतेचा संदेश मिळावा. तसेच विविध क्षेत्रात काम करणाऱ्या ब्राह्मण समाजातील व्यक्तींना लाभ व्हावा. ब्रह्मोद्योग २०२३ च्या व्यासपीठावर दिल्लीतील ‘द अशोका हॉटेल’ येथे उद्योजक, डॉक्टर व विधीज्ञ यांच्यासाठी राष्ट्रीय परिषदांचे आयोजन करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे दिल्लीतील कॉन्स्टिट्यूशन क्लब येथे संपूर्ण देशातील ब्राह्मण उद्योजकांची उत्पादने किंवा सेवा यांचे एक्झीबिशन देखील आयोजित करण्यात येणार आहे. या व्यतिरिक्त, दिनांक २७ फेब्रुवारी २०२३ रोजी अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाच्या विविध राज्यातील पदाधिकाऱ्यांची बैठक दिल्लीतील प्रसिद्ध तालकटोरा स्टेडियम येथे आयोजित करण्यात आली आहे.