नारायणगाव : जुन्नर तालुक्यातील ओतूरजवळील डोमेवाडी येथे बिबट्याने केलेल्या हल्ल्यात शेतमजूर जखमी झाला. मंगळवार ही घटना घडली.

गोरख पुनाजी शेळकंदे (वय २९, रा. वालहिवरे) असे शेतमजुराचे नाव आहे. डोमेवाडी येथील शेतकरी ज्ञानेश्वर ढोमसे यांच्या शेतात शेळकंदे हे मजूर म्हणून काम करतात. ते शेताच्या कडेला लघुशंकेसाठी गेले असता बिबट्याने त्यांच्यावर हल्ला केला. त्यांनी आरडाओरड केल्यावर शेतातील अन्य मजूर आणि स्थानिक नागरिक त्या ठिकाणी आले. त्यानंतर बिबट्याने पळ काढला. नागरिकांनी शेळकंदे यांना ओतूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल केले.

या घटनेची माहिती मिळताच वनविभागाच्या पथकाने घटनास्थळी जाऊन पाहणी केली. वन विभागाच्या वतीने नागरिकांना सावधनता बाळगण्याचे आवाहन करण्यात आले आहे. बिबट्याला पकडण्यासाठी त्या ठिकाणी पिंजरा लावण्यात येणार असल्याचे वनविभागाकडून सांगण्यात आले.

शिरूर आणि आंबेगाव तालुक्यात आतापर्यंत १७ बिबटे पकडण्यात आले असून, हे सर्व बिबटे जुन्नर येथील ‘माणिकडोह बिबट निवारण केंद्रात’ ठेवण्यात आले आहेत. शिरुरमध्ये सर्वाधिक बिबटे आढळले आहेत. या तालुक्यात बारा बिबट्यांना जेरबंद करण्यात आले असून, नरभक्षम बिबट्याला गोळ्या मारून ठार करण्यात आले. शिरूर शहराजवळील अण्णापूर गावातील ढग्या डोंगरावर एक बिबट्या मृतावस्थेत आढळून आला.

पुणे-अहिल्यानगर रस्त्यावर अज्ञात वाहनाची ठोकर बसून बिबट्या मृत्युमुखी पडल्याची घटना रविवारी रात्री साडेनऊच्या सुमारास घडली. जुन्नर, शिरूर, आंबेगाव भागात बिबट्यांनी हल्ले केल्याचे प्रकार घडत असतानाच आता भोर तालुक्यातील नसरापूर, जांभळी गावांमध्येही बिबट्यामुळे गावकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

आंबेगाव, जुन्नर, खेड, शिरूर तालुक्यांतील बिबट्यांचे हल्ले रोखण्यासाठी पुढील सहा महिन्यांत ५०० ते ७०० बिबटे गुजरात येथील वनतारा येथे स्थलांतरित करण्याचा निर्णय राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत घेण्यात आला आहे. तसेच ठिकठिकाणी कृत्रिम बुद्धिमत्तेवर (एआय) आधारित सायरन सिस्टम बसविले जाणार आहेत. पिंजरे खरेदी करण्यासाठी राज्य सरकारकडून १० कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे. आंबेगाव, जुन्नर, खेड आणि शिरूर तालुक्यांमध्ये वन कर्मचाऱ्यांची संख्या वाढविण्याची नागरिकांची मागणी आहे.

दरम्यान, ऊस पीक क्षेत्रात सध्या मोठ्या प्रमाणात बिबट्याचा अधिवास वाढल्याने मानव आणि बिबट्या संघर्ष होत आहे. या पार्श्वभूमीवर ऊसतोडणीवेळी काय काळजी घ्यावी, कारखान्यांनी कोणत्या सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, याची नियमावली साखर आयुक्तालयाने तयार केली आहे. शेतामध्ये एकट्याने जाणे टाळावे. समूहाने काम करावे. लहान मुले आणि ज्येष्ठांना घराच्या बाहेर किंवा शेतात एकटे सोडू नये. घराबाहेर किंवा शेतामध्ये रात्री झोपू नये. ऊसतोड कामगारांच्या वास्तव्याच्या ठिकाणी सौरऊर्जा कुंपण करावे. दिवस उगविण्यापूर्वी किंवा मावळल्यानंतर शेतात जाणे टाळावे, या नियमांचा समावेश आहे.