पुणे : बेशिस्त वाहनचालकांविरुद्ध नागरिकांना तक्रारी करता याव्यात, यासाठी पुणे पोलिसांनी विकसित केलेल्या ‘पीटीपी ट्रॅफिकॉप’ या मोबाइल ॲपद्वारे गेल्या दोन दिवसांत दीडशेहून जास्त तक्रारी आल्या आहेत. ट्रिपल सीट, विरुद्ध दिशेने जाणे, वाहन चालविताना मोबाइलवर संभाषण अशा प्रकारच्या तक्रारी करण्यात आल्या आहेत. तक्रार करणाऱ्याचे नाव गोपनीय ठेवण्यात येणार असून, तक्रारीवर काय कार्यवाही करण्यात आली, याचा प्रतिसादही पोलिसांकडून देण्यात येत आहे.
‘वाहतूक नियम मोडणाऱ्या चालकांविरोधात नागरिकांना आता थेट तक्रार करता येणार असून, त्याची पडताळणी करून वाहतूक विभागाकडून ४८ तासांत कारवाई केली जाणार आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते या ॲपचे शनिवारी उद्घाटन करण्यात आले. त्यानंतर गेल्या दोन दिवसांत या ॲपवर दीडशेहून जास्त पुणेकरांनी तक्रारी नोंदविल्या आहेत. या ॲपला चांगला प्रतिसाद दिला आहे. या ॲपचा अधिकाधिक वापर नागरिकांनी केल्यास बेशिस्तांवर प्रभावी कारवाई करता येणे शक्य होईल,’ असे अतिरिक्त पोलीस आयुक्त मनोज पाटील यांनी सांगितले.
‘वाहतूककोंडी, अपघातांचे वाढते प्रमाण आणि वाहतूक पोलिसांकडे असलेले मर्यादित मनुष्यबळ या पार्श्वभूमीवर पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्या संकल्पनेतून हे ॲप विकसित करण्यात आले आहे. ॲपच्या माध्यमातून नागरिक हे बेशिस्त वाहनचालकांचे छायाचित्र आणि माहिती पोलिसांकडे पाठवू शकतात. पदपथावर उभ्या असलेल्या किंवा चालविल्या जाणाऱ्या वाहनांची माहिती, विरुद्ध दिशेने वाहन चालविणे, ट्रिपल सीट, वाहन चालवताना मोबाइल वापरणे, फॅन्सी वाहन क्रमांक, काळी फिल्म लावलेली वाहने अशा प्रकारच्या नियमभंगाबाबत नागरिक तक्रार करू शकतील. तक्रार मिळाल्यानंतर ४८ तासांत पडताळणी करून पोलिसांकडून कारवाई करण्यात येणार आहे,’ असे त्यांनी नमूद केले.
तक्रारदाराचे नाव गोपनीय
तक्रारदाराने दिलेली माहिती गोपनीय ठेवण्यात येणार असून, तक्रारदाराचे नाव उघड न करण्याची दक्षता घेण्यात आली आहे. याशिवाय वाहतूककोंडी रोखण्यासाठी या ॲपच्या माध्यमातून अपघात, रस्त्यावरील खड्डे, रस्त्यात पाणी साचणे, झाड कोसळणे, वाहन बिघडणे, बेवारस वाहन याबाबतची माहिती नागरिक देऊ शकणार आहेत, असे वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त अमोल झेंडे यांनी सांगितले.
तक्रारींचे स्वरूप
पदपथावर बेशिस्तपणे वाहने लावण्याच्या सर्वाधिक तक्रारी करण्यात आल्या आहे. ट्रिपल सीट, विरुद्ध दिशेने जाणे, वाहन चालविताना मोबाइलवर संभाषण अशा प्रकारच्या तक्रारी करण्यात आल्या आहेत, असे अतिरिक्त पोलीस आयुक्त मनोज पाटील यांनी सांगितले.
आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर
हे ॲप विकसित करताना पोलिसांनी आधुनिक तंत्रज्ञान वापरले आहे. नेमके छायाचित्र कधी काढले आहे. ते कोणत्या भागातील आहे, हे समजते. तसेच वाहनचालकांवर दंडात्मक कारवाईसाठी ई-चलन प्रणालीशी हे ॲप जोडण्यात आले आहे. हे वापरण्यास सुलभ आहे. नागरिकांनी वाहतूक नियमभंगाचा प्रकार विचारात घेऊन संबंधित शीर्षकानुसार (हेड) तक्रारी कराव्यात, असे आवाहन त्यांनी केले आहे.