‘‘अभ्यासक्रमात काय ठेवावे हे ठरवणाऱ्या सर्व संस्था वतनदारांच्या हाती असल्यामुळे आजच्या शिक्षणाच्या आशयावर आपल्याला लक्ष ठेवावे लागणार आहे. सरकारने शिक्षणपद्धती बदलण्याचा उपक्रम हाती घेतला असून नवीन क्रमिक पुस्तकेही नेमण्याचा प्रयत्न सुरू आहे. विकृत आणि असत्य शिक्षणावर शिकणाऱ्या समाजात वतनदारांचे तत्त्वज्ञान सांगणारे पोपट तयार होणार असतील तर त्याद्वारे आपण विकृत पिढीच तयार करत आहोत,’’ असे मत सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती पी. बी. सावंत यांनी व्यक्त केले.
बौद्ध युवक परिषदेतर्फे रविवारी आयोजित केलेल्या ‘जातीव्यवस्थाअंत परिषदे’च्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. ज्येष्ठ लेखक राजन खान, संघटनेचे अध्यक्ष गौतम भोसले या वेळी उपस्थित होते. वतनदार जेव्हा सत्तेत येतात तेव्हा शिक्षण आणि प्रसारमाध्यमे या खात्यांकडे विशेष लक्ष पुरवले जाते, असे सांगून सावंत म्हणाले, ‘‘तुकारामाला स्वर्गात घेऊन जाण्यास विमान येते अशा अवैज्ञानिक गोष्टी सांगणारे आजचे शिक्षण आहे. वतनदारांचे जे देव आहेत ते तुमचे शत्रू असले तरी तुम्हाला त्यांना देव मानावे लागणार आहे. असे असत्य शिक्षण जाती आणि धर्मामधील तेढ वाढवणारे असेल, तसेच प्रसारमाध्यमांद्वारे सबंध समाजाचे शिक्षणही तसे करण्याचा प्रयत्न होऊ शकतो. बहुजन समाजाची नवी पिढीदेखील आपला इतिहास विसरून वतनदारांनी समोर ठेवलेले आदर्शच पाळत आहे. त्यामुळे आपण घेत असलेल्या शिक्षणाच्या आशयावर लक्ष ठेवण्याची गरज आहे.’’ जे जातीअंतविरोधी ते प्रशासनात येणार नाहीत याची काळजी घ्यायला हवी, असेही त्यांनी सांगितले.
राजन खान म्हणाले, ‘‘धर्म आणि जातींशिवाय जगता येते अशी मांडणी आपण करू लागलो की जाती-धर्माच्या दुकानदाऱ्या चालवणारी मंडळी फार क्रूरपणे अंगावर येतात. आपल्या देशात माणूस म्हणून मोकळ्या श्वासाने जगताच येत नाही. तुम्ही ज्या टोळीत असता त्या टोळीचे तुम्ही बादशहा; दुसऱ्या टोळीत गेल्या-गेल्या तुमची किंमत संपते. देव नाकारणाऱ्या बुद्धाला आपण देव करून ठेवले आणि त्यालाही जात आणि धर्म चिकटवला. गौतम बुद्धांपासून बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा फुल्यांपर्यंत सर्वाचीच दुकानदारी सुरू झाली आहे.’’
‘ ‘घरवापसी’ झालेल्यांना कोणत्या जातीत बसवणार?’
पी. बी. सावंत म्हणाले, ‘‘ हिंदू धर्मात ज्यांना विषम स्थितीत ठेवले गेले ते लोक निरनिराळ्या धर्मात गेले. ५ टक्के लोकांचे सक्तीने किंवा फसवणुकीने धर्मातर केले गेले असेल, पण इतर जण छळणूक झाली म्हणून इतर धर्मात गेले होते. ही छळणूक जातीव्यवस्थेने केली. आता ‘घरवापसी’ झाल्यानंतर या लोकांना कोणत्या जातीत बसवणार असा प्रश्न मला पडतो.’’
संग्रहित लेख, दिनांक 29th Dec 2014 रोजी प्रकाशित
‘वतनदारांच्या हातातील शिक्षणाच्या आशयावर लक्ष ठेवा’
विकृत आणि असत्य शिक्षणावर शिकणाऱ्या समाजात वतनदारांचे तत्त्वज्ञान सांगणारे पोपट तयार होणार असतील तर त्याद्वारे आपण विकृत पिढीच तयार करत आहोत.

First published on: 29-12-2014 at 03:15 IST
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: P b sawant education rajan khan ghar wapsi