पुणे : पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपीएल) व्यवस्थापकीय संचालक तथा अध्यक्षपदी पंकज देवरे यांची नियुक्ती झाली आहे. देवरे यांची नुकतीच भारतीय प्रशासकीय सेवेत पदोन्नती झाली असून, सनदी अधिकारी म्हणून त्यांच्यावर पहिली जबाबदारी ‘पीएमपी’ची देण्यात आली आहे. विद्यमान व्यवस्थापकीय संचालक तथा अध्यक्ष दीपा मुधोळ-मुंडे यांची समाजकल्याण विभागाच्या आयुक्तपदी बदली करण्यात आली आहे.
मुंडे यांनी वर्षभरापूर्वीच ‘पीएमपी’चा पदभार स्वीकारला होता. या काळात त्यांनी पीएमपीच्या सक्षमीकरणासाठी प्रयत्न केले. प्रवाशांना भेडसावणाऱ्या अडचणी त्यांनी स्वतः पीएमपीतून प्रवास करून जाणून घेतल्या. तसेच अन्य अधिकाऱ्यांनाही त्यांनी पीएमपीतून प्रवास करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यांच्याच कार्यकाळात पीएमपीच्या भाडेवाढीचा अकरा वर्षांनी निर्णय घेण्यात आला. कमी उत्पन्न देणारे मार्ग बंद करणे, सदोष बस कमी केल्यामुळे बस बंद पडण्याच्या प्रमाणात घट करणे, पर्यटन आणि धार्मिक स्थळांच्या ठिकाणी अतिरिक्त सेवा सुरू करून उत्पन्नवाढीसाठीच्या उपाययोजना केल्या. ‘पुढील थांबा उद्घोषणा’ ही स्वयंचलित प्रणाली, मार्ग फलकांची तपासणी करण्यासह महिलांच्या सुरक्षित प्रवासासाठी विशेष प्रयत्न केले.
‘पीएमपी’चे नवनियुक्त अध्यक्ष पंकज देवरे हे लातूर जिल्हा जातपडताळणी समितीचे अध्यक्ष येथे कार्यरत होते. त्यांना अतिरिक्त जिल्हाधिकारी पदावरून भारतीय प्रशासकीय सेवेत नुकतीच राज्य सरकारकडून पदोन्नती देण्यात आली आहे. त्यामुळे ‘पीएमपी’चे व्यवस्थापकीय संचालक तथा अध्यक्षपद ही देवरे यांची पहिलीच जबाबदारी ठरली आहे.