पुणे : प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी प्रवासी वाहनांमधील ‘पॅनिक बटन’ (आपत्कालीन परिस्थितीत सूचना देणारे उपकरण) यंत्रणा आणि वाहनमागोवा प्रणाली (व्हेईकल लोकेशन ट्रॅकिंग डिव्हाईस – व्हीएलटीडी) सुरू आहे किंवा नाही, याची आता परिवहन विभागाकडून तपासणी केली जाणार आहे. एक जानेवारी २०१९ नंतर नोंद झालेल्या प्रवासी वाहनांना वाहनयोग्यता नूतनीकरण प्रमाणपत्र देताना ही तपासणी होणार आहे. याबाबतचे आदेश परिवहन विभागाने मोटार वाहन निरीक्षकांना दिले आहेत.
रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाच्या २०१८ मध्ये जारी केलेल्या निर्देशानुसार प्रवाशांची सुरक्षितता आणि सुरक्षा सुनिश्चितता, अपघातामध्ये वैद्यकीय प्रतिसाद, महिला सुरक्षितता आणि इतर आपत्कालीन परिस्थितीत मदत मिळण्यासाठी प्रवासी वाहनांमध्ये ‘व्हीएलडीटी’ आणि ‘पॅनिक बटन’ ही यंत्रणा बसविणे बंधनकारक करण्यात आले. त्यानुसार २०१९ पासून राज्यभरात अंमलबजावणी सुरू करण्यात आली. त्याच वेळी परिवहन विभागाने संबंधित उपकरणे तयार करणाऱ्या कंपन्यांना अधिकृत परवाने देऊन जिल्हानिहाय केंद्रांमधून उपकरणे बसविण्यात आली. मात्र, त्यानंतर ही यंत्रणा सुरू नसल्याने अनेक वाहनांमधील उपकरणे बंद पडली. तसेच ‘पॅनिक बटन’ उपकरण बसविणाऱ्या बहुतांश कंपन्या बंद पडल्या. आता पॅनिक बटनाची तपासणी केल्याशिवाय वाहनयोग्यता नूतनीकरण प्रमाणपत्र न देण्याच्या सूचना परिवहन विभागाने दिल्या आहेत. त्यामुळे संबंधित व्यावसायिक वाहनधारकांची अडचण झाली आहे.
आरटीओकडून नवीन केंद्रचालकांची यादी जाहीर करण्यात आली असून, या केंद्रांमध्ये जुन्या उपकरणाच्या दुरुस्तीसाठी अतिरिक्त रकमेची मागणी केली जात आहे. वाहनातील उपकरण बसविण्यासाठी यापूर्वी २५ ते २७ हजार रुपये खर्च केल्यावर आता दुरुस्तीसाठी नव्याने खर्च करावा लागणार असल्याने वाहनधारकांपुढे आर्थिक पेच निर्माण झाला आहे.
आदेशात काय?
वाहनयोग्यता प्रमाणपत्र नूतनीकरणासाठी येणाऱ्या वाहनांपैकी किमान १० टक्के वाहनांतील ‘व्हीएलटीडी’ आणि पॅनिक बटन दाबून ते कार्यरत असल्याची खातरजमा करावी. त्यासाठी मुंबई येथील स्थापन करण्यात आलेल्या नियंत्रण कक्षात संपर्क करून खातरजमा करावी. ‘व्हीएलटीडी’ उपकरण ४.० प्रणालीद्वारे देण्यात आलेल्या प्रमाणपत्रानुसार उपकरणावरील आयएमईआय क्रमांक जुळतो किंवा नाही याची तपासणी मोटार वाहन निरिक्षकांनी करावी.
प्रवासी वाहनांमध्ये ‘पॅनिक बटन’ आणि ‘व्हीएलटीडी’ यंत्रणा बंधनकारक करण्यात आली आहे. कोणतीही कारणे न देता वाहनधारकांना दोन्ही यंत्रणा सुरू कराव्या लागतील.- विवेक भीमनवार, परिवहन आयुक्त
वाहनांमध्ये ‘व्हीएलटीडी’, ‘पॅनिक बटन’ यंत्रणा बसविण्याचा निर्णय अत्यंत चांगला आहे. मात्र, ही यंत्रणा सुरू करण्यासाठी पूर्वतयारी आणि चाचणी आवश्यक होती. वाहनांमध्ये ‘पॅनिक बटन’ बसवून सुमारे साडेपाच वर्षे उलटल्यानंतरही अद्याप यंत्रणा सुरू नाही. संबंधित उपकरणे बसविणाऱ्या कंपन्या बंद पडल्या आहेत. परिवहन विभागाने अचानक घेतलेला निर्णय चुकीचा आहे. व्यावसायिक वाहतूक संघटना, संबंधित कंपन्या, अधिकारी यांच्यासोबत चर्चा करणे अपेक्षित होते.- बाबा शिंदे, अध्यक्ष, माल आणि प्रवासी वाहतूक संघटना, महाराष्ट्र राज्य
‘पॅनिक बटन’ची कार्यपद्धती
प्रवासी वाहनामधील ‘पॅनिक बटन’ दाबल्यानंतर ती माहिती परिवहन विभागाच्या मुंबई येथील नियंत्रण कक्षात जाईल. त्या ठिकाणी वाहतूक पोलीस आणि आरटीओचे कर्मचारी असतील. नियंत्रण कक्षाकडून संबंधित वाहन कोणत्या ठिकाणी आहे, हे ‘जीपीएस’ यंत्रणेद्वारे तपासले जाईल. त्यानंतर स्थानिक पोलीस ठाण्याला माहिती कळविण्यात येईल. त्यामुळे तातडीने पोलिसांची मदत मिळू शकणार आहे.