पिंपरी : पावसाळा सुरू असल्याने पवना आणि इंद्रायणी नदीच्या पाण्यातील गढूळतेचे प्रमाण वाढले आहे. गढूळ अशुद्ध पाणी शुद्ध करण्यासाठी रासायनिक पदार्थांच्या प्रमाणाचाही वापर वाढला आहे. त्यासाठी तीन कोटी १३ लाख रुपयांची रसायने घेण्यात येणार आहेत. याबाबतच्या प्रस्तावाला महापालिका आयुक्त शेखर सिंह यांनी स्थायी समितीची मान्यता दिली आहे.

पिंपरी-चिंचवड शहराला मावळातील पवना आणि आंद्रा धरणातून पाणीपुरवठा केला जातो. पवना धरणातून सोडण्यात येणारे पाणी नदीमधून रावेत बंधाऱ्यातून उचलले जाते. निगडी, सेक्टर क्रमांक २३ येथील जलशुद्धीकरण केंद्रामध्ये ते पाणी शुद्ध केले जाते. तर, आंद्रा धरणातील पाणी इंद्रायणी नदीत साेडून निघोजे बंधाऱ्यातून दाेन पंपाद्वारे उचलले जाते. तेथून चिखलीतील जलशुद्धीकरण केंद्रात पाणी आणले जाते. तिथे अशुद्ध पाण्यावर प्रक्रिया केल्यानंतर जलवाहिन्यांद्वारे पाणी शहराला वितरित केले जात आहे. पावसाळ्याचे चार महिने महापालिका थेट पवना, इंद्रायणी नदीतील पाणी उचलते.

पावसाळ्यात पाण्याची गढूळता वाढली आहे. त्यामुळे पाणी शुद्धीकरणासाठी रासायनिक पदार्थांचा वापरही जास्त करावा लागतो. हे गढूळ पाणी शुद्ध करण्यासाठी पॉली ॲल्युमिनियन क्लोराईड द्रवरूप व पावडर वापरली जाते. पाणीपुरवठा विभागाने रसायन खरेदीसाठी निविदा प्रक्रिया राबविली होती. निविदेतील अटी शर्तीनुसार, आवश्यकता भासल्यास त्याच दराने वाढीव रसायने पुरवण्याची जबाबदारी संबंधित ठेकेदारावर देण्यात आली होती. त्यानुसार एसव्हीएस केमिकल्स कार्पा एलएलपी आणि गुजरात अल्कलीज ॲण्ड केमिकल्सकडून द्रवरूप व पावडर स्वरूपात रसायने घेण्यात येणार आहे. त्यासाठी तीन कोटी १३ लाख १२ हजार ४९६ रुपये खर्च होणार आहे. त्याला स्थायी समितीमध्ये मान्यता देण्यात आली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

रावेतला बंधारा बांधण्याची मागणी

झपाट्याने वाढणारी लोकसंख्या, औद्योगिक विकास लक्षात घेता, सध्याच्या रावेत बंधाऱ्याची क्षमता अपुरी ठरत आहे. हा बंधारा शंभर वर्षांपूर्वी ब्रिटिश कालखंडात बांधण्यात आला. गाळाने भरला असून पाण्याची साठवण क्षमता कमी झाली आहे. या बंधाऱ्यात एक दिवसापुरते पाणी साठवले जाऊ शकते. शहराच्या वाढत्या गरजांसाठी चार दिवस पुरेल असा जलसाठा राखून ठेवण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी रावेत येथील जुन्या बंधाऱ्याच्या जागी आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित साडेचार मीटर उंचीचा नवा बंधारा बांधण्याची मागणी आमदार शंकर जगताप यांनी केली आहे.

पावसाळ्याचे चार महिने थेट नदीतून पाणी उचलले जाते. त्यामुळे पाण्याचा गढूळपणा जास्त असतो. पाण्यातील गढूळपणा कमी करण्यासाठी रसायनाचा जास्त वापर करावा लागतो. पाणी शुद्ध करून नागरिकांना वितरित केले जाते. – अजय सूर्यवंशी, सह शहर अभियंता, पाणी पुरवठा विभाग, पिंपरी-चिंचवड महापालिका.