पिंपरी : पोटात दुखणे आणि शौचास त्रास होत असल्याने ६४ वर्षीय रुग्ण पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या नवीन थेरगाव रुग्णालयात दाखल झाला. या रुग्णास मधुमेहजन्य आम्लता (डायबेटिक केटोॲसिडोसिस), डाव्या हृदयपिंडाच्या स्नायूंची वाढ (लेफ्ट व्हेंट्रिक्युलर हायपरट्रॉफी) व डायस्टॉलिक डिसफंक्शन अशा गुंतागुंतीच्या तक्रारीही होत्या. युरोलॉजी विभागातील डॉक्टरांनी दुर्बिणीतून शस्त्रक्रिया करून मूत्रपिंडातील दहा सेंटिमीटर लांबीची गाठ यशस्वीरीत्या बाहेर काढली.
पोटात दुखत असल्याने ६४ वर्षीय रुग्ण सहा दिवसांपूर्वी महापालिकेच्या नवीन थेरगाव रुग्णालयात दाखल झाला. या रुग्णाच्या मूत्रपिंडात पाण्याच्या दोन गाठी झाल्या होत्या. त्यातील एक गाठ मोठी होती. त्यामुळे पोटात दुखत होते. शौचासही त्रास होत होता. रुग्णाचा मधुमेह नियंत्रणात नव्हता. शस्त्रक्रियेच्या वेळी रुग्णाच्या रक्तातील साखरेचे प्रमाण, श्वसन-रक्ताभिसरण संतुलन, तसेच शस्त्रक्रियेतील स्थिती यांचा विशेष विचार करून काटेकोर व्यवस्थापन करण्यात आले. मधुमेह नियंत्रणात आणला. त्यानंतर युरोसर्जन डॉ. सुनील पालवे आणि डॉ. हनुमंत फड यांनी कौशल्यपूर्णरीत्या दुर्बिणीतून शस्त्रक्रिया पूर्ण केली. मूत्रपिंडातील दहा सेंटिमीटर आकाराची गाठ बाहेर काढली. दुसऱ्या लहान गाठीला दोन छिद्र पाडले. त्यातून पाणी बाहेर काढले. संपूर्ण शस्त्रक्रिया कोणतीही गुंतागुंत न होता सुरळीतपणे पार पडली. गाठ बाहेर काढताच रुग्णाचा त्रास कमी झाला. त्यामुळे रुग्णाला घरी सोडण्यात आल्याचे डॉ. सुनील पालवे यांनी सांगितले.
आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. लक्ष्मण गोफणे म्हणाले, ‘युरोलॉजी विभागात झालेल्या शस्त्रक्रियेत ॲनेस्थेशिया, मेडिसिन, युरोलॉजी अशा सर्व विभागांनी एकत्रितपणे काम करून उत्कृष्ट समन्वय साधला. त्यामुळेच ही शस्त्रक्रिया यशस्वीरीत्या पूर्ण करणे शक्य झाले झाले.’
नवीन थेरगाव रुग्णालयात युरोलॉजी विभागातील पहिली मोठी शस्त्रक्रिया यशस्वी होणे ही वैद्यकीय विभागासाठी अभिमानाची बाब आहे. महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये अत्याधुनिक वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून दिल्या जात आहेत. त्यामुळे नागरिकांना उत्तम उपचार सेवा स्थानिक पातळीवर मिळण्यास मदत होत आहे. विजयकुमार खोराटे, अतिरिक्त आयुक्त, पिंपरी-चिंचवड महापालिका