पिंपरी : सेंटर फॉर डेव्हलपमेंट ऑफ ॲडव्हान्स्ड कम्प्युटिंगच्या (सी-डॅक) सहकार्याने पिंपरी-चिंचवड महापालिकेने प्रगत पर्जन्यमान व पूर अंदाज (अर्ली डिटेक्शन सिस्टीम) प्रणाली कार्यान्वित केली आहे. यामुळे हवामान, वायू गुणवत्ता आणि पूर यांचे अचूक अंदाज वर्तवणे, आपत्ती व्यवस्थापन आणि धोरणात्मक निर्णय प्रक्रियेत गती आणून प्रभावी उपाययोजना राबविणे शक्य होणार आहे.

केंद्र सरकारच्या इलेक्ट्रॉनिक्स व माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाच्या राष्ट्रीय सुपरकम्प्युटिंग मिशनअंतर्गत ही यंत्रणा विकसित करण्यात आली आहे. ‘सी-डॅक’ने शहरातील पर्यावरणीय समस्यांचा अर्थात पावसाचे प्रमाण, पूर, वायुप्रदूषण, उष्णतेच्या लाटा यांचा अभ्यास करून संगणकीय मॉडेल तयार केले आहे. मल्टि-सेक्टोरियल सिम्युलेशन प्रयोगशाळेची उभारणी केली आहे. तिच्या मदतीने सहायक आराखडा विकसित केला जात आहे. यामुळे प्रशासनाला धोरणात्मक निर्णय घेण्यासाठी मदत होणार आहे. या पद्धतीच्या माध्यमातून पाऊस, पूर, वायुप्रदूषण यांसारख्या शहरी पर्यावरणीय समस्या ओळखता येणार असून, वेळेवर उपाययोजना करणे शक्य होणार आहे.

प्रणालीची ठळक वैशिष्ट्ये

  • उच्च कार्यक्षम संगणक आधारित एकात्मिक प्रणाली
  • प्रभाग, गाव आणि तहसील स्तरावर हवामान, वायू गुणवत्ता यांचे उच्च ‘रिझोल्यूशन मॉडेलिंग’
  • प्रणालीच्या माध्यमातून ७२ तासांपूर्वीच पाऊस, उष्णतेची किंवा थंडीची लाट, पूर, वायुप्रदूषण यांचा अचूक अंदाज
  • प्रणालीद्वारे निरीक्षणे व विदेच्या आधारे आपत्ती व्यवस्थापन आणि निवारणासाठी प्रशासनाला वेळीच निर्णय घेण्यास साहाय्यभूत

सुरक्षित शहरासाठी आपत्तीपूर्व तयारी अत्यावश्यक आहे.‘सी-डॅक’च्या सहकार्याने विकसित केलेली प्रणाली पिंपरी-चिंचवड शहराला अधिक सक्षम,जागरूक आणि आपत्ती निवारणास सज्ज बनविणार आहे.या प्रणालीच्या मदतीने धोरणनिर्मितीपासून नागरिकांच्या सुरक्षेपर्यंत प्रत्येक टप्प्यावर परिणामकारक निर्णय घेता येणार आहेत.-प्रदीप जांभळे-पाटील,- अतिरिक्त आयुक्त, पिंपरी-चिंचवड महापालिका