पिंपरी : हस्तांतरणीय विकास हक्क (टीडीआर) खर्ची टाकण्यास आयुक्तांनी मनाई केली असतानाही दोन अभियंत्यांनी रावेत येथील गृहनिर्माण बांधकामाच्या मिळकतीवर मोशीतील ‘टीडीआर’ खर्ची टाकून बांधकाम परवानगी दिल्याचे निदर्शनास आले आहे. प्रशासनाची दिशाभूल केल्याचा ठपका ठेवत दाेघांचीही विभागीय चाैकशी करण्याचे आदेश आयुक्त शेखर सिंह यांनी दिले आहेत.

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या बांधकाम परवानगी व अनधिकृत बांधकाम नियंत्रण विभागात संभाजी गायकवाड हे कनिष्ठ तर दिनेश फाटक हे उपअभियंता म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्याकडील रावेत येथील बांधकाम परवानगीविषयक आणि तांत्रिक, प्रशासकीय महत्त्वपूर्ण कामकाज सोपविले आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

रावेत येथील गृहनिर्माण बांधकामाच्या मिळकतीवर मोशीतील ‘टीडीआर’ टाकण्यास आयुक्त शेखर सिंह यांनी मनाई केली हाेती. मात्र, संबंधित दोन्ही अभियंत्यांनी रावेत येथील मिळकतीवर मोशी येथील मिळकतीवरील ‘टीडीआर’ खर्ची टाकल्याचे निदर्शनास आले. ही बाब गंभीर स्वरूपाची आणि प्रशासनाची दिशाभूल करणारी असल्याने गायकवाड आणि फाटक यांना कारणे दाखवा नाेटीस बजावून खुलासा करण्याचे आदेश देण्यात आले हाेते. मात्र, दाेघांनीही सादर केलेला खुलासा संयुक्तिक नसल्याचे प्रशासनाचे मत आहे. त्यामुळे गायकवाड आणि फाटक यांची विभागीय चाैकशी करण्याचे आदेश आयुक्त सिंह यांनी दिले आहेत. तसेच त्यांची बांधकाम परवानगी व अनधिकृत बांधकाम नियंत्रण विभागातून पाणी पुरवठा विभागात बदली करण्याचाही आदेश आयुक्तांनी दिला आहे.