पिंपरी : ‘पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या १३ जलतरण तलावांपैकी १२ तलाव ठेकेदाराला चालविण्यास देण्याबाबतची निविदा प्रक्रिया पूर्ण झाली आहे. त्यापैकी ११ तलाव ठेकेदाराला हस्तांतरित करण्यात आले असून एक तलाव हस्तांतरित करण्याची कार्यवाही सुरू असल्याची माहिती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधान परिषदेत दिली.
‘महापालिकेच्या जलतरण तलावांच्या देखभाल दुरुस्तीवर करण्यात आलेल्या कोट्यवधी रुपयांच्या खर्चाची माहिती महापालिकेच्या स्थापत्य विभागाकडे नाही. १३ पैकी १० तलाव ठेकेदारांना चालविण्यात देण्यात आले आहेत. उर्वरित तीनही तलाव ठेकेदाराला देण्यात येणार आहेत. तलावाच्या खर्चाची एकत्रित माहिती प्रशासनाकडे नाही हे खरे आहे का, महापालिकेकडून क्रीडा स्थापत्यविषयक कामासाठी वार्षिक १३० कोटींचा निधी राखीव ठेवण्यात येत आहे.
तलावासाठी नेमण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांच्या वेतनावर दोन कोटी, सुरक्षेसाठी ८० लाख, अन्य खर्चासाठी एक कोटी २५ लाख रुपये वर्षाला खर्च करण्यात येत आहे. त्यामध्ये महापालिकेच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांकडून अनियमितता करण्यात येत आहे. तलाव देखभाल दुरुस्तीचा खर्च अधिक असल्याने तलाव ठेकेदारांना चालविण्यास दिले आहेत का,’ याबाबत विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, आमदार उमा खापरे, प्रवीण दरेकर यांनी तारांकित प्रश्न विचारला होता. या प्रश्नाला उत्तर देताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ही माहिती दिली.
‘तलावांच्या देखभाल दुरुस्तीच्या खर्चाची माहिती उपलब्ध आहे. महापालिकेच्या १३ जलतरण तलावांपैकी १२ तलाव ठेकेदाराला चालविण्यास देण्याबाबतची निविदा प्रक्रिया पूर्ण झाली आहे. त्यापैकी ११ तलाव ठेकेदाराला हस्तांतरित करण्यात आले. एक तलाव हस्तांतरित करण्याची कार्यवाही सुरू आहे. तलावासाठी नेमण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांच्या वेतनावर दोन कोटी, सुरक्षेसाठी ८० लाख, अन्य खर्चासाठी एक कोटी २५ लाख रुपये वर्षाला खर्च करण्यात येत असल्याचे खरे नाही.
तलावावर पोहण्यासाठी उन्हाळ्यात गर्दी होते. तलाव संचलन देखभाल दुरुस्तीचा खर्च महापालिकेसाठी खर्चिक आहे. त्यामुळे महापालिकेने सर्व तलाव ठेकेदारांना चालविण्यास देण्याचा निर्णय घेतला आहे. तलावांच्या सुरक्षिततेसाठी महापालिकेने सुरक्षारक्षकांची नेमणूक केली आहे. व्यवस्थापक, जीवरक्षक, स्थापत्य व यांत्रिकीविषयक किरकोळ दुरुस्ती, वीज देयक, पाणी शुद्धीकरण, परिसर स्वच्छता, साफसफाईचा खर्च ठेकेदारांकडून करण्यात येत आहे. स्थापत्य क्रीडाविषयक कामांसाठी २०२४-२५ मध्ये २६ कोटी रुपयांची तरतूद केली होती. त्यापैकी जलतरण तलावाच्या देखभाल दुरुस्तीसाठी ५० लाख खर्च झाला आहे. २०२५-२६ साठी ३३ कोटींची तरतूद केली आहे. तलावासाठी कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांना दिल्या जाणाऱ्या सुविधा ठेकेदारांमार्फत दिल्या जात आहेत.’ असे उपमुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले.