पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेचे संकेतस्थळ देखभाल-दुरुस्तीसाठी शुक्रवारी रात्री आठ वाजल्यापासून सोमवारी (१६ जून) सकाळी सहापर्यंत संकेतस्थळ बंद राहणार आहे. त्यामुळे नागरिकांना मालमत्ता कर भरणे, जन्म-मृत्यू नोंदणीसह इतर सर्व कामे दोन दिवस करता येणार नाहीत.
पिंपरी-चिंचवड महापालिकेने नागरिकांना डिजिटल माध्यमातून अधिक पारदर्शक, सक्षम व गतिमान सेवा पुरवण्यासाठी संकेतस्थळ विकसित केले आहे. या संकेतस्थळावर नागरिकांना विविध माहिती, सेवा आणि तक्रार करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. यात मालमत्ता कर भरणे, जन्म आणि मृत्यूची नोंदणीसह विविध सुविधा ऑनलाइन उपलब्ध करून दिल्या आहेत. तसेच, विविध सार्वजनिक सेवांसाठी ऑनलाइन अर्ज आणि माहिती, शहराच्या विकास योजना आणि नियमांची माहिती, विविध नियम, मार्गदर्शक तत्त्वे आणि धोरणांची माहिती, शहराशी संबंधित नवीन अपडेट्स, योजना आणि कार्यक्रमांची माहिती संकेतस्थळावर प्रसिद्ध केली जाते.
नागरिकांना ऑनलाइन तक्रार करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. या सर्व सुविधा ऑनलाइन केल्यामुळे नागरिकांना दिलासा मिळाला आहे. पण, महापालिका प्रशासनाने देखभाल दुरुस्तीसाठी दोन दिवस संकेतस्थळ बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. सोमवारी सकाळी सहानंतर संकेतस्थळ पूर्ववत होईल, अशी माहिती मुख्य माहिती व तंत्रज्ञान अधिकारी नीळकंठ पोमण यांनी दिली.