पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहरातील नागरिकांना बस, मेट्रो, एसटी, रेल्वे आदी सार्वजनिक वाहतुकीचा पर्याय उपलब्ध व्हावा, सुरक्षितपणे स्थानक व थांब्यांपर्यंत तसेच, रस्ता ओलांडण्यासाठी महामेट्रोकडून कासारवाडीतील नाशिक फाटा चौकात पादचारी पूल (फूट ओव्हर ब्रिज) उभारण्यात येत आहे. त्यामुळे नागरिकांना वेगवेगळ्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा लाभ सहजपणे घेता येणार आहे. सार्वजनिक वाहतुकीसाठी उभारलेला हा शहरातील पहिला पादचारी सेतू ठरणार आहे.
नाशिक फाटा चौकात निगडी ते दापोडी दुहेरी बीआरटी मार्ग आहे. भोसरी, चाकण ते पुणे अशी बस सेवा आहे. कासारवाडी रेल्वे स्थानक आहे. पुणे-नाशिक महामार्ग असल्याने येथील एसटी थांब्यावरून नाशिकला ये-जा करता येते. मेट्रोचे नाशिक फाटा स्थानक या चौकात आहे. जेआरडी टाटा दुमजली उड्डाण पुलावरून कासारवाडीहून भोसरीला जाता येते. उड्डाण पुलावर नाशिक फाटा ते वाकड बीआरटी मार्ग आहे. त्यामुळे या चौकातून दररोज हजारो नागरिक ये-जा करतात.
या चौकात पादचारी व प्रवाशांना रस्ता ओलांडण्यासाठी तसेच, स्थानक व बस थांब्यांवर ये-जा करण्यासाठी सुरक्षित असा स्वतंत्र मार्ग नव्हता. त्यामुळे नागरिकांना असुरिक्षतपणे ये-जा करावी लागते. सुरक्षित वाहतुकीसाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेकडून येथे पादचारी पूल उभारण्यात येणार होता. मात्र, महामेट्रोने त्यासाठी पुढाकार घेत प्रत्यक्ष कामही सुरू केले. आत्तापर्यंत ३७ टक्के काम झाले आहे. कामाची मुदत सव्वावर्षे आहे. पुढील वर्षी ऑगस्टपर्यंत पूल पूर्ण करण्याचे नियोजन आहे.
‘सिग्नल’ मुक्त चौक करण्याचा निर्णय रद्द
निगडी ते दापोडी समतल विलगक (ग्रेडसेपरेटर) मार्ग बनविताना महापालिकेने हा १२.५० किलोमीटर अंतराचा मार्ग वाहतूक नियंत्रण दिवे (सिग्नल) मुक्त करण्याची घोषणा केली होती. त्यानंतर मेट्रोचे काम संपल्यानंतर नाशिक फाटा चौक दिवे मुक्त करण्यात येईल, असे सांगितले. आता हा चौक वाहतूक नियंत्रण दिवेमुक्त करण्याचा निर्णय रद्द करण्यात आला आहे. वाहनांच्या वाढत्या संख्येचा विचार करून हा चौक वाहतूक नियंत्रण दिवे मुक्त करण्यात येणार नसल्याचे महापालिकेच्या शहरी दळणवळण विभागाने स्पष्ट केले.
दापोडी ते निगडी बीआरटी बस, नाशिक फाटा ते वाकड बीआरटी बस, रेल्वे, मेट्रो तसेच, पादचाऱ्यांना सुरक्षितपणे ये-जा करता येईल, असा पादचारी पूल उभारण्याबाबत महामेट्रोस सांगितले. महापालिका, वाहतूक पोलिसांशी चर्चा करून हा पूल उभारण्यात परवानगी देण्यात आली. त्यामुळे धोकादायकरीत्या रस्ता ओलांडण्याचा प्रकार थांबणार आहे, असे शहरी दळणवळण विभागाचे सहशहर अभियंता बापूसाहेब गायकवाड यांनी सांगितले. महामेट्रोकडून हा पादचारी पूल बांधण्यात येत आहे. भारतरत्न जेआरडी टाटा उड्डाण पूल, बीआरटी मार्गावरील बस थांबे, नाशिक फाटा चौकातील दोन्ही बाजूचे सेवा रस्ते, नाशिक फाटा मेट्रो स्थानक, बीआरटीचे दोन्ही बाजूचे थांबे, कासारवाडी रेल्वे स्थानकाला जोडणारा हा पूल पादचाऱ्यांसाठी सोयीस्कर असणार आहे. मेट्रोतून उतरल्यानंतर बस, रेल्वे या सार्वजनिक वाहतुकीचा प्रवाशांना लाभ घेता येईल, असे महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डीकर यांनी सांगितले.