पुणे जिल्ह्यातील अपघातांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. या अपघातांमधील तब्बल ९० टक्के अपघात हे दुचाकी आणि पादचारी यांच्याशी निगडित आहेत. त्यामुळे त्यांना सर्वाधिक अपघाताचा धोका असल्याचे निदर्शनास आले आहे. याचबरोबर अपघात घडण्याचे प्रमाण संध्याकाळी आणि पहाटेच्या वेळी अधिक असल्याचे समोर आले आहे. अपघातांमध्ये पुणे शहर, पिंपरी-चिंचवड शहर, शिरूर तालुका, जुन्नर तालुक्यामध्ये अपघातांचे प्रमाण अधिक आहे.
प्रादेशिक परिवहन कार्यालयाने जानेवारी २०२२ व जानेवारी २०२३ या महिन्यातील रस्ते अपघातांचे तुलनात्मक विश्लेषण केले आहे. त्यात ही धक्कादायक माहिती समोर आली आहे. यानुसार, रात्री होणाऱ्या अपघातांची संख्या जास्त आहे. रस्त्यावर वाहनांची संख्या रात्रीच्या वेळी कमी असूनही अपघात अधिक आहेत. संध्याकाळी ६ ते रात्री ९ या कालावधीत सर्वाधिक अपघात घडत आहेत. याचबरोबर रात्री २ ते पहाटे ५ या वेळेत अपघाताची संख्या अधिक आहे. एकूण अपघातांमध्ये दुचाकी अपघात व पादचाऱ्यांशी निगडित अपघातांचे प्रमाण तब्बल ९० टक्के आहे. मागील वर्षी जानेवारी महिन्यात २४९ अपघात घडले. या अपघातांमध्ये १४१ प्राणांतिक होते. त्यात दुचाकी आणि पादचारी यांच्याशी निगडित प्राणांतिक अपघातांची संख्या अनुक्रमे ७४ आणि ३० आहे. चालू वर्षी जानेवारी महिन्यात ३८९ अपघात घडले असून, त्यात १४६ प्राणांतिक होते. त्यामध्ये दुचाकी आणि पादचारी यांच्याशी निगडित प्राणांतिक अपघातांची संख्या अनुक्रमे १०२ आणि २७ आहे.
पुण्याचे प्रादेशिक परिवहन कार्यालय आणि इतर कार्यालयांच्या सहकार्याने जिल्ह्यातील अपघात कमी करण्यासाठी विविध उपाययोजना राबवण्यात येत आहेत. मागील कालावधीच्या तुलनेत अपघात आणि मृत्युमुखी पडलेल्यांच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे. ही चिंतेची बाब आहे. यासाठी पुढाकार घेऊन स्वतःची व सहप्रवाशांची सुरक्षा लक्षात घ्यावी. सर्वांनीच नियम पाळून सुरक्षित वाहन चालवणे आवश्यक आहे.
हेही वाचा >>>पुणे : मुलीला पोलीस भरतीसाठी घेऊन आलेल्या वडिलांच्या मृत्यू प्रकरणी ट्रकचालक गजाआड
सरकारी कर्मचाऱ्यांवरही कारवाईचा दंडुका
सर्व शासकीय व निमशासकीय कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी दुचाकीचा वापर करताना हेल्मेट परिधान करूनच कार्यालयाच्या आवारात प्रवेश करावा अन्यथा त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार आहे. तसेच, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ, शिक्षण विभाग, जिल्हा परिषद, महाविद्यालय, बँक आदी विभागांना कर्मचाऱ्यांनी हेल्मेट वापर करण्याबाबत पत्र देण्यात आले आहे. तसेच, या ठिकाणी या कार्यालयाचे मोटार वाहन निरीक्षक व साहाय्यक मोटार वाहन निरीक्षक हेल्मेट वापराबाबत प्रबोधन करीत आहेत, अशी माहिती प्रादेशिक परिवहन अधिकारी अजित शिंदे यांनी दिली.
अपघातप्रवण स्थळांचे ”जिओ टॅगिंग”
प्रादेशिक परिवहन कार्यालयाने तालुकानिहाय मोटार वाहन निरीक्षिक व साहाय्यक मोटार वाहन निरीक्षक यांची रस्ता सुरक्षा प्रबोधन करणे व त्यादृष्टीने वाहन तपासणी करण्यासाठी नियुक्ती केली आहे. अपघातप्रवण क्षेत्राचे ”जिओ टॅगिंग” केले जात आहे. ”जिओ टॅगिंग” झाल्यानंतर अपघातप्रवण क्षेत्रातील उपाययोजना संबंधित विभागाला कळविण्यात येणार आहेत.