महानंदचा महाघोळ भाग : ४
दत्ता जाधव, लोकसत्ता
पुणे : मुंबईला रोज एक कोटी लिटर दूध लागते, त्यापैकी ९० लाख लिटर दूध, तर दहा लाख लिटरच्या दुग्धजन्य पदार्थाची गरज असते. मुंबईत अजूनही महानंदचे नाव आहे, ब्रॅण्डवर लोकांचा विश्वास आहे. महानंद बंद पडले तर मुंबईची हक्काची बाजारपेठ खासगी किंवा परराज्यातील कंपन्यांच्या हातात जाणार आहे.
गुजरातचा अमूल, कर्नाटकचा नंदिनी मुंबईची बाजारपेठ काबीज करत आहे. राजस्थानचा सरस ब्रॅण्ड मुंबईच्या बाजारात उतरण्याच्या तयारीत असताना महानंद बंद पडणे मुंबईकर, शेतकरी आणि सरकारच्याही हिताचे असणार नाही. महानंदचे मोक्याच्या जागी प्रकल्प आहेत. प्रकल्पांची क्षमताही मोठी आहे. त्यामुळे महानंदला नवसंजीवनी देणे फारसे कठीण नाही. मुंबईला रोज ९० लाख लिटर दूध लागते, त्यात १४ लाख लिटर अमूल, आठ लाख लिटर गोकुळ, दोन लाख लिटर नंदिनी, एक लाख लिटर वारणा, ७० हजार लिटर गोवर्धन, ४० हजार लिटर प्रभात आणि अन्य जिल्हा आणि तालुका संघांचा वाटा आहे. तर दहा लाख लिटरच्या दुग्धजन्य पदार्थाच्या बाजारात अमूल ५ लाख लिटर, इतर डेअरींचा पाच लाख लिटर वाटा आहे. त्यात रोज सुगंधी दूध एक लाख लिटर, दही दीड लाख लिटर, ६० ते ७० हजार किलो तूप आणि ३० ते ३५ हजार किलो पनीरचा समावेश आहे. महानंद बंद पडले तर जगातील हा सर्वात मोठा दूध आणि दुग्धजन्य पदार्थाचा बाजार परराज्यातील खासगी कंपन्यांच्या हातात जाणार आहे.
महानंद पूर्ण क्षमतेने सुरू राहण्यात मुंबईचे हित आहे. महानंद बंद झाले तर खासगी दूध कंपन्यांची मनमानी वाढेल. दुधाचे दर वाढतील. विशेषकरून झोपडपट्टीत राहणाऱ्या आणि सामान्य महानंद गरजेचे आहे.
– राजेश परजणे-पाटील अध्यक्ष, महानंद
(समाप्त)