लोकसत्ता प्रतिनिधी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पुणे: उच्चशिक्षित मात्र नोकरी न करणाऱ्या पतीला पत्नीने ५० हजार रुपयांची कायमस्वरूपी पोटगी देण्याचे मान्य केले. त्यामुळे विभक्त होण्याच्या अटी ठरवून दोघांनी संमतीने दाखल केलेला घटस्फोटाचा दावा न्यायालयाने निकाली काढला. पत्नीने नोकरीबाबत खोटी साक्ष दिल्याने पतीने त्याबाबतची तक्रार दाखल केली होती. त्यानंतर पत्नीने तडजोडीची तयारी दर्शवली होती.

सह दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर एस. व्ही. फुलबांधे यांनी याबाबतचा निकाल दिला. पत्नीने तडजोडीची तयारी दाखवून कायमस्वरूपी पोटगी देण्याचे मंजूर केल्यानंतर पतीनेदेखील पोटगीच्या अंतरिम आदेशाबाबत दाखल केलेले अपील आणि पत्नीने खोटी साक्ष दिल्याची तक्रार मागे घेतली. पतीच्या वतीने ॲड. नरेंद्र बाबरे यांनी बाजू मांडली.

आणखी वाचा-मद्यपी वाहनचालकांना १० हजारांचा दंड अन् परवानाही होणार रद्द

अक्षय आणि सुषमा (नावे बदललेली) असे या जोडप्याचे नाव आहे. त्यांचा ऑगस्ट २०१८ मध्ये विवाह झाला होता. कौटुंबिक वाद झाल्याने ते जून २०२० पासून विभक्त राहत आहेत. अक्षय यांनी बी.टेक.चे शिक्षण घेतले आहे. सुषमा यांनी एम. टेकची पदवी मिळवली आहे. त्या एका खासगी कंपनीत नोकरी करतात.

वाद झाल्याने सुषमा यांनी पतीपासून घटस्फोट मिळावा, यासाठी अर्ज केला होता. त्यात न्यायालयाने पोटगीचा अंतरिम आदेश दिला होता. मात्र, पोटगी मिळवण्यासाठी पत्नीने खोटे प्रतिज्ञापत्र दाखल केल्याची बाब पतीने न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिली आणि याबाबत न्यायालयात तक्रारही दिली होती. नोकरी नसल्याने पत्नीनेच पोटगी द्यावी, असा अर्जदेखील अशोक यांनी दाखल केला होता. मात्र, न्यायालयाने तडजोडीने दावा निकाली काढण्याबाबत विचारणा केली असून, दोघांनी त्यास तयारी दाखवली. पत्नीने पोटगी देण्यास होकार दिला.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Permanent alimony from highly educated wife to husband pune print news rbk 25 mrj
First published on: 09-05-2023 at 08:39 IST