पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेने खड्डे व्यवस्थापन प्रणाली विकसित केली आहे. या अंतर्गत ‘पॉटहोल मॅनेजमेंट’ हे ‘ॲप’ विकसित करण्यात आले असून, नागरिकांना या ॲपद्वारे खड्ड्यांची तक्रार नोंदविता येणार आहे.

महापालिकेची पावसाळापूर्व कामांची तयारी सुरू आहे. पावसाळ्यामध्ये खड्ड्यांची समस्या सातत्याने उद्भवते. या समस्येवर उपाय म्हणून महापालिकेने ‘पॉटहोल ॲप’ विकसित केले आहे. या ॲपमुळे खड्ड्यांची तक्रार नोंदवण्याची आणि त्या तक्रारींचे निराकरण करण्याची प्रक्रिया सोपी आणि सुलभ होणार आहे. नागरिक या ॲपद्वारे खड्ड्याची तक्रार नोंदवू शकतात आणि तिच्या निराकरणाविषयी अद्ययावत माहिती मिळवू शकतात.

ॲपद्वारे खड्ड्याची तक्रार नोंदविण्यासाठी नागरिकांना पॉटहोल ॲपमध्ये लॉग-इन करावे लागणार आहे. त्यानंतर नागरिक खड्ड्याचे छायाचित्र काढून त्याच्या स्थानासह ते अपलोड करू शकतात. ही माहिती आपोआप संबंधित विभागातील कनिष्ठ अभियंत्यांना त्यांच्या प्रभागानुसार पाठवली जाईल. त्याच वेळी ती माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांनाही पाठवली जाईल. तक्रार नोंदवल्यानंतर तिचे निराकरण करण्यासाठी ती संबंधित अधिकाऱ्याकडे दिली जाईल. दिलेल्या तक्रारीचे निराकरण झाले नाही, तर त्या भागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांना ई-मेल आणि संदेश पाठवण्यात येईल. एखादी तक्रार कनिष्ठ अभियंत्यांच्या अधीन नसल्यास ती महापालिकेच्या ज्या विभागाशी संबंधित आहे, त्या विभागाकडे पाठवण्यात येईल. तक्रारीचे निराकरण संबंधित विभाग किंवा अभियंता यांनी केल्यानंतर ती तक्रार ॲपमध्ये बंद केली जाईल आणि तक्रारदारास छायाचित्रासह निराकरणाची माहिती ई-मेल, संदेशाद्वारे कळवली जाईल, असे महापालिकेच्या स्थापत्य विभागाने सांगितले.

तक्रार कशी नोंदविता येईल?

मोबाइलमध्ये लोकेशन सर्व्हिस सुरू करावी. त्यावर क्लिक करून सध्याचे लोकेशन पाहावे. नकाशावर खड्ड्याचे स्थान निवडावे. जवळचा ओळखण्याजोगा पत्ता, संदर्भ द्यावा. कमी खोल खड्डा, खोल खड्डा, चेंबर, त्याची अंदाजे लांबी व रुंदी मीटरमध्ये लिहावी. खड्ड्याचे स्पष्ट छायाचित्र अपलोड करावे. त्यानंतर तक्रार ‘सबमिट’ करावी. एक विशिष्ट तक्रार क्रमांक देण्यात येईल. काम पूर्ण झाल्यानंतरचे छायाचित्र आणि काम पूर्ण झाल्याचा अहवाल तक्रारदाराला नोंदणीकृत ई-मेलवर पाठवला जाईल

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

शहरातील रस्ते खड्डेमुक्त असावेत, यासाठी महापालिका सातत्याने प्रयत्नशील आहे. नागरिकांनादेखील रस्त्यांवरील खड्ड्यांची तक्रार सहज करता यावी, यासाठी खड्डे व्यवस्थापन प्रणाली सुरू करण्यात येत आहे. खड्डे व्यवस्थापन प्रक्रियेमध्ये पारदर्शकता, जबाबदारी आणि कार्यक्षमतेची वाढ करून रस्ते अधिक सुरक्षित आणि सुरळीत करण्याचा प्रयत्न आहे.

  • शेखर सिंह, आयुक्त, पिंपरी-चिंचवड महापालिका