पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या ‘श्रमदान एक दिवस-एक तास-एक साथ’ या उपक्रमाने निगडीतील भक्ती-शक्ती चौकात स्वच्छतेचा महाउत्सव गुरुवारी झाला. दोन हजारांहून अधिक नागरिकांनी स्वच्छता मोहिमेत सहभाग घेतला. भक्ती-शक्ती चौकातून ट्रान्सपोर्टनगरी चौक, देहूरोड चौक, अंकुश चौक, पिंपरी चौक, आकुर्डी चौक या ठिकाणी जाणाऱ्या रस्त्यांवर स्वच्छता मोहिमेत १२ टन कचरा गोळा करण्यात आला.

आयुक्त शेखर सिंह म्हणाले, ‘स्वच्छता सर्वेक्षण २०२४-२५ मध्ये पिंपरी-चिंचवड शहराने राज्यात प्रथम, तर देशात सातवा क्रमांक मिळवला आहे. यामध्ये सफाई मित्रांचे योगदान आहे. शहरामध्ये दैनंदिन स्वच्छता राहावी, यासाठी महापालिकेचे सफाई कर्मचारी अहोरात्र कार्यरत असतात.

आता स्वच्छता सर्वेक्षण २०२५-२६ मध्ये देशात अग्रेसर यायचे आहे. त्या अनुषंगाने महापालिका विविध उपक्रम राबवत असून, नागरिकदेखील या उपक्रमांमध्ये सहभागी होत आहेत. ‘श्रमदान एक दिवस-एक तास-एक साथ’ या उपक्रमाला शाळकरी विद्यार्थ्यांपासून ज्येष्ठ नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळाला.’

आठवड्यातील दोन तास स्वच्छतेसाठी

‘आम्ही अशी शपथ घेतो, की स्वतः स्वच्छतेप्रति जागरूक राहू आणि त्यासाठी वेळही देऊ. दर वर्षी शंभर तास म्हणजे प्रत्येक आठवड्यातून दोन तास श्रमदान करून स्वच्छतेच्या या संकल्पाला पूर्ण करू, स्वतः घाण करणार नाही, दुसऱ्यालाही करू देणार नाही. स्वतःपासून, आमच्या कुटुंबापासून, आमच्या गल्ली/वस्तीपासून, कार्यस्थळापासून या कामास सुरुवात करू, अशी स्वच्छतेची शपथ देण्यात आली.

स्वाक्षरी मोहिमेला प्रतिसाद

श्रमदान एक दिवस-एक तास-एक साथ या मोहिमेंतर्गत भक्ती शक्ती चौक येथे आयोजित करण्यात आलेल्या स्वाक्षरी मोहिमेला चांगला प्रतिसाद मिळाला. स्वाक्षरी फलकांवर आयुक्त शेखर सिंह यांनीही स्वाक्षरी करताना ‘स्वच्छता ही सेवा’ असा संदेश लिहिला.