पिंपरी : वहिनीला मद्यपान करण्याची सवय होती. तसेच ती दुसऱ्या पुरूषांसोबत फिरायला जात होती. अनेकांकडून तिने कर्जही काढले होते. या गोष्टीला भाऊ विरोध करायचा, म्हणून भावाला तिने जीवे मारल्याची फिर्याद चिंचवड भोईर कॉलनीतील मयत व्यक्तीच्या भावाने दिली आहे.
चारित्र्यावर संशय घेत असल्याने महिलेने कापडाने गळा आवळून पतीचा खून केल्याची घटना शुक्रवारी चिंचवडमधील भोईर कॉलनीत घडली. याप्रकरणी पोलिसांनी पत्नीला अटक केली आहे. याबाबत मयत व्यक्तीच्या भावाने चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यात वाहिनीबाबत धक्कादायक खुलासे करण्यात आले आहेत.
या फिर्यादीमध्ये म्हटले आहे की, वहिनीला आपला भाऊ हा मद्यपान करू नकोस, दुसऱ्या पुरूषांबरोबर फिरत जाऊ नकोस आणि लोकांकडून कर्ज काढू नकोस, असे सांगत होता. याचा राग मनात धरून वहिनीने भावाच्या गळ्याला निळा कपडा गुंडाळून जिवे मारल्याचे फिर्यादीमध्ये म्हटले आहे.
भोसरीत तरुणावर कोयत्याने वार
जुन्या वादातून तरुणाला लाकडी दांडक्याने मारहाण करत कोयत्याने वार करण्यात आले. ही घटना भोसरीतील राणतारा कॉलनी परिसरात घडली. पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली आहे. अक्षय गोडसे (वय ३०) आणि सोन्या गुप्ता (वय १८, दोघेही रा. राणतारा कॉलनी, सद्गुरुनगर, भोसरी) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नरसिंह विजय रसाळ (वय २३, रा. मोहननगर, भोसरी) यांनी याबाबत भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी आणि फिर्यादी यांच्यात पूर्वी झालेल्या भांडणाच्या कारणावरून आरोपींनी फिर्यादीस शिवीगाळ, दमदाटी करून कोयत्याने आणि लाकडी दांडक्यांनी मारहाण केली. या हल्ल्यात फिर्यादी व त्याचे मित्र गंभीर जखमी झाले आहेत. भोसरी पोलीस याबाबत अधिक तपास करत आहेत.
अपहरण करून खंडणी वसूल
‘तुझ्या भावाला उचलले आहे, दोन हजार रुपये दे नाहीतर सोडणार नाही’ अशी धमकी देत खंडणी वसूल करण्यात आल्याची घटना चिखली परिसरात घडली आहे. याप्रकरणी एका तडीपार आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत १९ वर्षीय तरुणाने चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने फिर्यादीला फोनवरून धमकी देत त्याच्या भावाला धरून ठेवल्याचे सांगितले. फिर्यादीने घाबरून दीड हजार रुपये आरोपीला दिले. त्यानंतर आरोपीने पुन्हा पैशांची मागणी करत ‘पुढच्या वेळेस नाही दिलेस तर घरातील सर्वांना उचलून नेईन’ अशी धमकी दिली. आरोपीने तडीपार आदेशाचाही भंग केला आहे. चिखली पोलीस याबाबत अधिक तपास करत आहेत.
पिंपरीत दोन तरुणांना सिमेंट गट्टूने मारहाण
जुन्या वादातून तिघा तरुणांनी एका तरुणास आणि त्याच्या भावाला सिमेंटच्या गट्टूने व लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. ही घटना भाटनगर, पिंपरी येथे घडली आहे. याबाबत २४ वर्षीय तरुणाने दिलेल्या फिर्यादीनुसार तिघांविरोधात पिंपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आणि त्यांचा भाऊ हे गप्पा मारत उभे होते. त्यावेळी तिथे आलेल्या आरोपींनी जुन्या वादातून त्यांना शिवीगाळ करीत सिमेंटच्या गट्टूने आणि लाथाबुक्क्यांनी हल्ला करून दोघांना जखमी केले. पिंपरी पोलीस याबाबत अधिक तपास करत आहेत.
गुटखा विक्री प्रकरणी एकास अटक
शासनाने बंदी घातलेला गुटखा आणि सुगंधी तंबाखू विक्री करणाऱ्या एक व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. ही कारवाई वडमुखवाडी परिसरात करण्यात आली. मुन्ना उर्फ सोयब हजरत अख्तर शेख (वय २५, वडमुखवाडी, ता. हवेली, पुणे) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकातील पोलीस नाईक चंद्रकांत छबु जाधव (वय ३२) यांनी याबाबत दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीकडून एकूण १३ हजार ३८१ रुपयांचा प्रतिबंधित गुटखा, सुगंधित तंबाखू आणि पानमसाला असा माल जप्त करण्यात आला आहे. शासनाच्या अधिसूचनेचे उल्लंघन करून आरोपी विक्री करीत असल्याचे उघड झाले आहे. दिघी पोलीस याबाबत अधिक तपास करीत आहेत.
हिंजवडीत गांजासह एकास अटक
गांजा विक्रीसाठी बाळगणा-या एकास पोलिसांनी अटक कली आहे. ही कारवाई हिंजवडीत करण्यात आली आहे. मोहमद जब्बार सय्यद (वय ४०, रा. वाकड) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. गुन्हे शाखा युनिट दोनमधील पोलीस अंमलदार रवि प्रकाश पवार (वय ४०) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीकडून ७५८ ग्रॅम वजनाचा, ३७ हजार ९०० रुपयांचा गांजा जप्त करण्यात आला आहे. आरोपी हा अमली पदार्थ विक्रीसाठी बाळगत असल्याचे निष्पन्न झाले. हिंजवडी पोलीस याबाबत अधिक तपास करत आहेत.
