पिंपरी : पैसे देण्यास नकार दिल्याच्या कारणावरून एका १७ वर्षीय मुलाला मारहाण करून त्याचे आणि त्याच्या मित्राचे मोबाईल व दुचाकी चोरून नेली. ही घटना बुधवारी (१० सप्टेंबर) दुपारी अंकुश चौक, ओटा स्कीम निगडी येथे घडली. याप्रकरणी १७ वर्षीय मुलाने निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार सोहेल संतोष जाधव (२०) याला अटक केली असून त्याच्या तीन साथीदारांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी मुलाने आरोपींना पैसे देण्यास नकार दिल्याने आरोपींनी त्याला लोखंडी फायटर आणि कोयत्याच्या उलट्या बाजूने मारहाण केली. तसेच, सर्व आरोपींनी मिळून त्याला व त्याच्या मित्राला लाथाबुक्क्यांनी मारहाण करून शिवीगाळ केली. मुलाचा मोबाईल, दुचाकी आणि त्याच्या मित्राचा मोबाईल असा एकूण एक लाख १४ हजार रुपयांचा मुद्देमाल जबरदस्तीने चोरून नेला. शस्त्रे दाखवून आरोपींनी परिसरात दहशत निर्माण केली. निगडी पोलीस तपास करत आहेत.

गांजा विक्री प्रकरणी तरुणाला अटक

गांजा विक्रीसाठी आलेल्या एका तरुणाला गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने अटक केली. ही कारवाई गुरुवारी (११ सप्टेंबर) दुपारी अजंठानगर, चिंचवड येथे करण्यात आली. विशाल मातीबर गौतम (२१, चिंचवड) याला अटक करण्यात आली आहे. पोलीस शिपाई प्रसाद कलाटे यांनी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी विशाल गौतम हा गांजा विक्रीसाठी आला असल्याची माहिती अमली पदार्थ विरोधी पथकाला मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा लावून विशाल याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून १० हजार ३०० रुपये किमतीचा २०६ ग्रॅम वजनाचा गांजा जप्त केला. निगडी पोलीस तपास करत आहेत.

पूर्ववैमनस्यातून तरुणाला मारहाण

जुन्या भांडणाच्या कारणावरून एका तरुणाला दगडाने मारहाण केली. ही घटना पिंपरी गाव येथे घडली. याप्रकरणी ४५ वर्षीय व्यक्तीने दिलेल्या फिर्यादीनुसार एका तरुणाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जुन्या भांडणाच्या कारणावरून आरोपीने फिर्यादीला शिवीगाळ करून हाताने मारहाण केली. कपाळावर दगडाने मारून जखमी केले. घराच्या खिडक्यांवर दगड मारून काचा फोडून नुकसान केले. पिंपरी पोलीस तपास करत आहेत.

वाहनाच्या धडकेत वृद्ध जखमी

पायी चालत जाणाऱ्या वृद्ध व्यक्तीला अज्ञात वाहनाने धडक देऊन जखमी केले. हा अपघात १ सप्टेंबर रोजी घडला असून याप्रकरणी ११ सप्टेंबर रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अपघात झाल्यानंतर वाहन चालक पळून गेला. विजय इरन्ना नायडू (६०, देहुरोड) असे जखमी व्यक्तीचे नाव आहे. त्यांनी याप्रकरणी देहुरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी विजय नायडू हे पूजेसाठी फुले आणण्यासाठी पायी जात होते. त्यावेळी मागून येणाऱ्या एका वाहनाने त्यांना धडक दिली. या अपघातात त्यांच्या उजव्या पायाच्या नडगीचे हाड आणि उजव्या हाताच्या मनगटाजवळील हाड फ्रॅक्चर झाले, तसेच उजव्या डोळ्याच्या भुवईजवळ जखम झाली. अपघातानंतर वाहन चालक कोणतीही मदत न देता पळून गेला. उपचारानंतर नायडू यांनी पोलिसात तक्रार दिली. देहुरोड पोलीस तपास करत आहेत.