पिंपरी : जुन्या भांडणाच्या कारणावरून दोघांनी एका तरुणाला मारहाण करून त्याच्या डोक्यात बिअरची बाटली फोडली. ही घटना पिंपळेगुरव येथे घडली.

यामध्ये २५ वर्षीय तरुण जखमी झाला आहे. त्याने सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आणि त्यांचे मित्र दुचाकीवरून जात होते. पिंपळे गुरव मधील सृष्टी चौकात आल्यानंतर त्यांना आरोपींनी अडवले. जुन्या भांडणाच्या कारणावरून आरोपींनी फिर्यादीला शिवीगाळ करून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. त्यानंतर बिअरच्या बाटल्या डोक्यात फोडून त्यांना जखमी केले. सांगवी पोलीस तपास करत आहेत.

वाहनाच्या धडकेत तरुणाचा मृत्यू

आळंदी-मरकळ रस्त्यावर वाहनाच्या धडकेत तरुणाचा मृत्यू झाला. गणेश किसान वाघमारे (२०) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी प्रवीण राजाराम लोखंडे (३९, मरकळ, खेड) यांनी आळंदी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार वाहन चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गणेश वाघमारे यांना एका अज्ञात वाहनाने धडक दिली. या अपघातात गणेश गंभीर जखमी झाले. त्यातच त्यांचा मृत्यू झाला. अपघात झाल्यानंतर अज्ञात वाहन चालक घटनास्थळी न थांबता पळून गेला. आळंदी पोलीस तपास करत आहेत.

भरधाव मोटारीची दुचाकीला धडक, दोन महिला जखमी

दोन महिला दुचाकीवरून जात असताना त्यांच्या दुचाकीला भरधाव मोटारीने धडक दिली. या अपघातात दुचाकीवरील दोन्ही महिला जखमी झाल्या. ही घटना खेड तालुक्यातील कुरुळी येथे घडली. याप्रकरणी ४० वर्षीय व्यक्तीने म्हाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार मोटार चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांची आणि त्यांच्या भावाची पत्नी दुचाकीवरून कुरुळी येथून जात होत्या. बापदेव मंदिराजवळ आल्यानंतर त्यांच्या दुचाकीला भरधाव मोटारीने समोरून धडक दिली. या अपघातात दोघी जखमी झाल्या. म्हाळुंगे एमआयडीसी पोलीस तपास करत आहेत.

नाकाबंदी करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याला मारहाण

चांदणी चौक, बावधन येथे नाकाबंदी सुरु असताना एका मोटार चालकाने एका पोलीस कर्मचाऱ्याला मारहाण केली. ही घटना सोमवारी (६ ऑक्टोबर) दुपारी घडली.

पोलीस हवालदार हनुमंत धुमाळ यांनी बावधन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी मोटार चालक शिव लक्ष्मण नळगिरे (३३, नऱ्हे, पुणे) याला अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी पोलीस हवालदार धुमाळ हे बावधन वाहतूक विभागात नेमणुकीस आहेत. वाहतूक विभागाकडून चांदणी चौक येथे नाकाबंदी लावण्यात आली होती. नाकाबंदी सुरु असताना आरोपी शिव हा त्याच्या मोटारीमधून तिथे आला. त्याने धुमाळ यांना शिवीगाळ, दमदाटी करून गचांडी पकडली. त्यानंतर धुमाळ यांना हाताने मारहाण करून सरकारी कामात अडथळा निर्माण केला. बावधन पोलीस तपास करत आहेत.

कोयता बाळगल्या प्रकरणी तरुणात अटक

बेकायदेशीरपणे कोयता बाळगल्या प्रकरणी चिंचवड पोलिसांनी एका तरुणाला अटक केली. ही कारवाई वाल्हेकरवाडी, चिंचवड येथे करण्यात आली.

शंकर ज्ञानेश्वर आडागळे (२१, गावडे चाळ, चिंचवड) असे अटक केलेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी पोलीस शिपाई मनोज पांढरे यांनी चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शंकर यांच्याकडे कोयता असल्याची माहिती चिंचवड पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी वाल्हेकरवाडी येथून शंकर याला ताब्यात घेतले. त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे एक कोयता आढळून आला.