पिंपरी- चिंचवड: तंत्रज्ञान खूप पुढे जात आहे. सध्या एआयचं युग आहे. अशात चोरटे देखील अपडेट म्हणजे एक पाऊल पुढे टाकत आहेत. गुगल मॅप चा उपयोग करून घरफोडी करणारे चोरटे गुन्हे शाखा युनिट पाच ने जेरबंद केले आहेत. हॉटेलमध्ये बसून उच्चभ्रू सोसायटीची गुगलवरून निवड करून चोरटे घरफोडी करायचे. याप्रकरणी गुन्हे शाखा युनिट पाच ने राजस्थानमधून आनंद सिंग पर्वत सिंग सरदार आणि गुरुदीप आनंद सिंह सिगलीकर यांना अटक केली आहे. आरोपींकडून तीन लाखांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.
पिंपरी- चिंचवड परिसरात घरफोडी करणाऱ्या राजस्थान येथील दोन सराईत गुन्हेगारांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. जुनी सांगवी परिसरात अज्ञात व्यक्तींनी घरफोडी करून सोने आणि चांदीचे दागिने लंपास केले होते. सांगवी पोलीस ठाण्यातील हा गुन्हा गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला. गुन्हे शाखा युनिट पाच पोलीस निरीक्षक अरविंद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू झाला. तांत्रिक तपास सुरू केला. घरफोडीमधील घटनास्थळ पाहिलं. शंभर ते सव्वाशे सीसीटीव्ही देखील तपासले.
दरम्यान, दोन्ही सराईत गुन्हेगारांनी घरफोडीचा गुन्ह्यात चोरीची दुचाकी वापरल्याचे स्पष्ट झालं. अधिक तापसांती गुरुदीप आणि आनंद सिंह हे राजस्थानमधील डुंगरपूर येथील असल्याचं समोर आलं. गुन्हे शाखा युनिटचे पोलीस उपनिरीक्षक भारत गोसावी, मयुरेश साळुंखे, गौस नदाफ, कुणाल शिंदे, रवी पवार यांची टीम थेट राजस्थान ला रवाना झाली. पोलिसांचं हे पथक आरोपीपर्यंत पोहचल आणि त्यांना अटक केली. आनंद सिंह आणि गुरूदीप यांचा दुसरा साथीदार (नाव अद्याप स्पष्ट नाही) गुगल वरून उच्चभ्रू सोसायटीची माहिती काढून, ते ठिकाण शोधून त्या सोसायटी भोवतालचा परिसर, घरफोडी केल्यानंतर पळून जाण्यासाठी लागणारे रस्ते हे आधीच गुगल वरून बघायचा आणि हे आरोपी घरफोडी करून पसार व्हायचे. अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. ही कारवाई गुन्हे शाखा युनिट पाच च्या टीम ने केली आहे. तिसऱ्या सराईत आरोपीचा शोध पोलीस घेत आहेत.