पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहरात सोमवारी दिवसभर कोसळलेल्या पावसामुळे आकुर्डी, चिंचवड, गुरुद्वारा येथील भुयारी मार्गासह शहरातील सखल भागात मोठ्या प्रमाणात पाणी साचले. निगडी, माेशी, संत तुकारामनगर, चिखली परिसर, सांगवी फाटा, भाेसरी एमआयडीसी, पिंपरी, चिंचवडमधील रस्ते जलमय झाले हाेते. सांगवी परिसरात काही घरात पाणी शिरले, तर साचलेल्या पाण्यातून वाहनचालक, नागरिकांना वाट काढताना कसरत करावी लागली.

पिंपरी-चिंचवड शहरात सोमवारी सकाळपासूनच पावसाला सुरुवात झाली. दिवसभर संततधार होती. जुन्या पुणे- मुंबई महामार्गावर एका बाजूने महामेट्राे आणि दुसऱ्या बाजूने अर्बन स्ट्रीटचे काम सुरू आहे. या कामामुळे ठिकठिकाणी खाेदाई करण्यात आली आहे. त्यामुळे या मार्गावर माेठे खड्डे पडले. निगडीतील टिळक चाैक ते बजाज ऑटाेपर्यंतच्या मार्गावर पाणी साचले होते. या रस्त्याला ओढ्याचे स्वरूप आले हाेते. यातून वाहन चालविताना चालकांना माेठी कसरत करावी लागली. यामुळे वाहतूक संथ हाेऊन काेंडी झाली.

चिंचवड, वाल्हेकरवाडी येथील गुरूद्वारा चाैक परिसरात पाणी तुंबले. पाणी साचल्याने भुयारी मार्ग वाहतुकीसाठी बंद करावा लागला. भाेसरी एमआयडीसी, शांतीनगर, पिंपरीतील डी. वाय. पाटील महाविद्यालयाकडून भाेसरीला जाणारा रस्ता, माेशीतील लक्ष्मी चाैक, भारतमाता चाैक, जाधववाडी, आकुर्डी-प्राधिकरणातील भुयारी मार्ग, पिंपरी साई चौकातील भुयारी मार्ग, एच.ए. कंपनीसमोरील भुयारी मार्गात पाणी साचले होते.

सांगवी फाट्यावरील भुयारी मार्गात मोठ्या प्रमाणात पाणी साचले. त्यामुळे सांगवी, नवी सांगवी, पिंपळेगुरवकडे जाणाऱ्या वाहनचालकांना त्रास सहन करावा लागला. पाणी साचल्यामुळे हा मार्ग तात्पुरता बंद करावा लागला. भोसरी गावठाणासह शहरातील विविध सखल भागांमध्ये तळीसदृश स्थिती झाली. सांगवीतील पवारनगर येथे घरांत पाणी शिरले. आकुर्डीतील गंगानगर येथे एक झाड काेसळले.

पवना धरणात २६ टक्के पाणी

पिंपरी-चिंचवडकरांची तहान भागविणाऱ्या पवना धरण परिसरातही पाऊस कोसळत आहे. त्यामुळे धरणातील पाणीसाठा वाढण्यास सुरुवात झाली आहे. धरणातील पाणीसाठा सोमवारी २६.२० टक्क्यांवर पोहोचला. पाणलोट क्षेत्रात गेल्या २४ तासांमध्ये ६५ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. त्यामुळे येवा वाढला. गेल्या वर्षी २६ मे रोजी धरणात २५.४३ टक्के इतका पाणीसाठा हाेता, असे शाखा अभियंता रजनीश बारिया यांनी सांगितले.

रस्त्यावर आलेला कचरा पाण्यामुळे चेंबरवरील झाकणाला अडकताे. त्यामुळे पाणी जाण्यास अडथळा निर्माण हाेताे. ज्या ठिकाणी पाणी तुंबल्याच्या तक्रारी येत आहेत, त्या ठिकाणी कर्मचारी पाठवून पाण्याचा निचरा करण्यात येत आहे.-देवन्ना गट्टूवार,सहशहर अभियंता, स्थापत्य विभाग, पिंपरी-चिंचवड महापालिका

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

कमी कालावधीत जास्त पाऊस पडत आहे. त्यामुळे पाण्याचा निचरा हाेण्यासाठी काही वेळ लागताे. साेमवारी सांगवीसह शहरातील काही ठिकाणी पाणी साचल्याच्या तक्रारी आल्या. उपाययाेजना करून पाण्याचा निचरा करण्याचे काम युद्ध पातळीवर करण्यात आले.-ओमप्रकाश बहिवाल, आपत्ती व्यवस्थापन अधिकारी, पिंपरी-चिंचवड महापालिका