पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिका, वन विभाग आणि वेदव्यास प्रतिष्ठानच्या संयुक्त विद्यमाने पिंपरी-चिंचवड शहरात एक लाख देशी वृक्षांची लागवड करण्यात येणार आहे. या उपक्रमात पहिल्या टप्प्यात ५० हजार देशी वृक्ष लागवड करण्यात येणार आहे. या मोहिमेचा प्रारंभ डुडूळगाव येथे महर्षी वेदव्यास प्रतिष्ठानचे अध्यक्ष स्वामी गोविंददेव गिरी यांच्या हस्ते झाला.

महापालिका आयुक्त शेखर सिंह, अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे-पाटील, वन विभागाचे उपवनसंरक्षक महादेव मोहिते, वनपरिक्षेत्र अधिकारी सुरेश वरक, महापालिकेचे मुख्य उद्यान अधीक्षक महेश गारगोटे, उद्यान अधीक्षक योगेश वाळुंज, उप उद्यान अधीक्षक राजेंद्र वसावे या वेळी उपस्थित होते. ‘वृक्ष मानवाचे खरे सोबती आहेत. देशी वृक्ष लागवड व संवर्धन करून भविष्यातील पिढ्यांना शुद्ध हवा, पाणी व निरोगी वातावरण मिळू शकते. येथील वसुंधरेला वाचविण्यासाठी देशी वृक्षांची लागवड करणे गरजेचे आहे. देशी वृक्ष लागवड मोहिमेत सहभागी होऊन प्रत्येकाने किमान एक झाड लावून ते मोठे करण्याचा संकल्प करावा’, असे आवाहन स्वामी गोविंददेव गिरी यांनी केले.

कोणत्या वृक्षांची लागवड?

निसर्गाशी सुसंगत वाढणारे वड, पिंपळ, आंबा, जांभूळ, चिंच, कडुनिंब, बहावा, पळस, उंबर, आवळा, साग, करवंद, शेवगा, जास्वंद, काटेसावर, बेल, अर्जुन, सिरिस, पांगारा, कांचन, हिजळ, पन्हाळ, खैर, शेवती, तामण, सोनचाफा, पारिजात, मोरिंगा, पांगळी, करवंद काटेरी, सावर, कडंब अशा विविध वृक्षांचे रोपण करण्यात येणार आहे. हे सर्व वृक्ष स्थानिक हवामान व मातीला अनुरूप असल्याचे मुख्य उद्यान अधीक्षक महेश गारगोटे यांनी सांगितले.

देशी वृक्ष लागवडीचे फायदे

देशी वृक्ष स्थानिक माती, पर्जन्यमान, हवामानाला सहज अनुरूप असल्याने त्यांची जोपासना सोपी होते. हे वृक्ष मातीची धूप थांबवतात, भूजलपातळी वाढवतात, हवामान बदलाचा परिणाम कमी करण्यास मदत करतात. पक्षी, प्राणी, कीटक, फुलपाखरे यांना देशी वृक्ष सुरक्षित अधिवास पुरवतात. या वृक्षांच्या फुला-फळांमुळे स्थानिक प्रजातींचे पोषण व संवर्धन होते. नीम, आवळा, बेल, अर्जुन यांसारखे देशी वृक्ष औषधी गुणधर्मांनी परिपूर्ण असून, आरोग्यवर्धक आहेत. वड, पिंपळ, आंबा, बेल यांसारख्या वृक्षांना भारतीय संस्कृतीत विशेष स्थान आहे. आंबा, चिंच, जांभूळ, करवंद यांसारख्या फळझाडांमधून पोषणासह शेतकऱ्यांना आर्थिक लाभ होतो. तसेच लाकूड, औषधी पदार्थ, पाने, बियांचा विविध उद्योगांमध्ये उपयोग होतो. देशी वृक्ष प्रदूषण शोषून घेण्याची क्षमता अधिक असल्याने शहरी परिसरात ते हवा शुद्ध ठेवतात. छाया व हरितपट्टा निर्माण करून नागरिकांना आरोग्यदायी वातावरण देतात, असे महापालिकेने सांगितले.

देशी वृक्ष हे निसर्गाच्या संतुलनाचे रक्षक आहेत. स्थानिक हवामान, माती व पर्जन्यमानाशी जुळवून घेणाऱ्या या वृक्षांची वाढ सुलभ होते. शहरामध्ये एक लाख देशी वृक्ष लागवड करण्याचा उपक्रम हाती घेतला आहे, असे अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे-पाटील यांनी सांगितले.