पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेने मोशी कचरा डेपो येथे उभारलेल्या कचऱ्यापासून वीजनिर्मिती (वेस्ट टू एनर्जी) या प्रकल्पातून मागील दोन वर्षांत तीन लाख ४१ हजार १११ टन कचऱ्यापासून १६ कोटी ६६ लाख ३६ हजार ७५० युनिटची वीजनिर्मिती करण्यात आली. या उपक्रमामुळे महापालिकेची ७६ कोटी ५७ लाख रुपयांची वीज देयकातील बचत झाली आहे. दररोज १४ मेगावॉट वीजनिर्मिती केली जात आहे.
पिंपरी-चिंचवड शहरातील घरोघरचा कचरा संकलित करून मोशीतील डेपोत टाकला जातो. गेल्या ३५ वर्षांपासूनचा कचरा येथे साचला आहे. ८१ एकर क्षेत्रातील डेपोत कचऱ्याचे डोंगर तयार झाले. शहरात दररोज एक हजार ३०० टन कचरा जमा होत आहे. शहरात कचऱ्याची समस्या गंभीर होऊ नये म्हणून महापालिकेने कचऱ्यापासून वीजनिर्मिती प्रकल्प सार्वजनिक-खासगी भागीदारी प्रकल्प (डीबीओटी) तत्त्वावर उभारला.
ऑक्टोबर २०२३ मध्ये हा प्रकल्प कार्यान्वित करण्यात आला. ऑगस्ट २०२५ पर्यंत या प्रकल्पाद्वारे तीन लाख ४१ हजार १११ टन कचऱ्यापासून १६ कोटी ६६ लाख ३६ हजार ७५० युनिट वीजनिर्मिती झाली आहे. यांपैकी प्रकल्प संचालनासाठी आवश्यक वीज खर्चवगळता १५ कोटी ५७ लाख ४० हजार १९८ युनिट वीज महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीच्या ग्रीडमध्ये पुरवण्यात आली. ही वीज महापालिकेच्या रावेत व चिखली जलशुद्धीकरण केंद्र, कासारवाडी व चऱ्होली मैलाशुद्धीकरण केंद्रे, तसेच थेरगाव रुग्णालयात वापरली जात आहे.
वायसीएम रुग्णालय, चिखली, भाटनगर, आकुर्डी, पिंपळे निलख आणि चिंचवड येथील मैलाशुद्धीकरण केंद्रालाही येथील वीज पुरविली जाणार आहे. या प्रकल्पामुळे मोशी कचरा डेपोवरील कचऱ्याचा भार मोठ्या प्रमाणात कमी झाला आहे. कचऱ्यातून हरित ऊर्जानिर्मितीमुळे शहराला स्वच्छ आणि पर्यावरणपूरक भविष्य मिळत आहे. कचऱ्यापासून वीजनिर्मिती हा प्रकल्प शाश्वत कचरा व्यवस्थापनाचा नमुना ठरत असल्याचा दावा महापालिकेने केला आहे.
महापालिकेस सध्या आवश्यक असणाऱ्या विजेची गरज कचऱ्यापासून वीजनिर्मिती या प्रकल्पातून करण्याचा प्रयत्न आहे. सर्व कार्यालयांना या प्रकल्पातून वीज दिली जाणार आहे. त्यासाठी हा प्रकल्प अत्यंत महत्त्वपूर्ण आहे, असे विद्युत विभागाचे सहशहर अभियंता अनिल भालसाकळे यांनी सांगितले.