पिंपरी : जलतरण तलावांचा वार्षिक उत्पन्नापेक्षा खर्च जास्त असल्याचा दावा करून महापालिकेकडून शहरातील पाच जलतरण तलाव खासगी संस्थांना सार्वजनिक-खासगी भागीदारी (पीपीपी) तत्त्वावर चालविण्यासाठी देण्यात येणार आहेत.

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने जलतरणपटूंना सरावाची सुविधा उपलब्ध व्हावी, नागरिकांना पोहण्याचा आनंद घेता यावा यासाठी केशवनगर, संभाजीनगर, कासारवाडी, पिंपरीगाव, यमुनानगर, पिंपळे गुरव, नेहरूनगर, वडमुखवाडी, भोसरी, मोहननगर, थेरगाव, सांगवी, आकुर्डी या भागांत १३ जलतरण तलावांची उभारणी करण्यात आली आहे. जलतरणपटूंना दर्जेदार प्रशिक्षण घेण्यासाठी तसेच सराव करण्यासाठी पिंपरी-चिंचवड शहराबाहेर जावे लागते. ही सोय शहरात उपलब्ध व्हावी यासाठी महापालिकेने काही तलाव सार्वजनिक-खासगी भागीदारीद्वारे चालविण्यास देण्याचे ठरवले आहे.

हेही वाचा >>> पुणे पाठोपाठ आता ‘मावळ’ही आमचे!, राष्ट्रवादी काँग्रेस म्हणते…

तज्ज्ञ प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षण देणाऱ्या संस्थांना महापालिकेच्या एकूण १५ जलतरण तलावांपैकी पाच जलतरण तलाव सार्वजनिक खासगी भागीदारीतून (पीपीपी) तत्त्वावर चालविण्यासाठी देण्यात येणार आहेत. त्या संस्थांकडून खेळाडूंसाठी स्वतंत्र प्रशिक्षणाची सुविधा उपलब्ध होईल. तसेच या खेळाडूंना तज्ज्ञ मार्गदर्शकांकडून प्रशिक्षणदेखील दिले जाईल, असा दावा क्रीडा विभागाने केला.

आकुर्डीतील तलाव बंद

कासारवाडी, यमुनानगर, पिंपरीगाव, वडमुखवाडी, चऱ्होली असे पाच जलतरण तलाव पीपीपी तत्त्वावर चालविण्यास देण्यात येणार आहेत. उर्वरित तलाव महापालिकेच्या वतीने चालविण्यात येणार आहेत. आकुर्डीतील तलावाची खोली मोठी असल्याने अडचणी येत आहेत. त्यामुळे हा जलतरण तलाव कायमचा बंद केला जाणार आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

महापालिकेचे पाच जलतरण तलाव पीपीपी तत्त्वावर खासगी संस्थेला चालविण्यास देण्यात येणार आहेत. त्याबाबतची निविदा प्रक्रिया लवकरच केली जाणार आहे.- मनोज लोणकर, उपायुक्त, क्रीडा विभाग